Latest

Shen Warner Death : अन् शेन वॉर्नने ९० अंशाच्या कोनात चेंडू वळवून उडवला ‘त्रिफळा’ (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा (दि. ४ मार्च) दिवस खूच धक्कादायक ठरला. ५२ वर्षीय ऑस्ट्रेलियाचे महान लेग स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन झाले. त्यामुळे अवघ्या क्रेकेट जगतावर शोककळा पसरली. ते ऑस्ट्रेलियासह जगातील महान गोलंदाज होते. एक प्रकारे फिरकी गोलंदाजीचे बादशहाच. त्यांना जादूगार शेन वॉर्न या नावानेही संबोधले जात असे. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक गोलंदाजांनी एकापेक्षा एक चेंडू टाकले आहेत. पण ४ जून १९९३ रोजी शेन वॉर्न यांनी टाकलेल्या एका चेंडूची नोंद 'बॉल ऑफ सेंच्युरी'ची म्हणून झाली.

४ जून १९९३ ला अॅशेस कसोटी मालिकेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना सुरु होता. इंग्लंडमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे हा कसोटी सामना खेळला जात होता. हा शेन वॉर्नचा पहिलाच अॅशेस कसोटी सामना होता. मात्र या दिवशी त्याने टाकलेल्या एका चेंडूची इतिहासात नोंद झाली. त्याच्या फिरकीबाबत कधी कुणी विचार केला नसेल अशी गोलंदाजी त्यांनी त्यावेळी केली आणि अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २८९ धावा केल्या होत्या. इंग्लंडची फलंदाजी आल्यानंतर त्यांनीही चांगली सुरुवात केली. मात्र जेव्हा चेंडू वॉर्नच्या हातात गेला. तेव्हा त्याने चमत्कारच करुन दाखवला. चेंडू हवेत उसळवून फिरकी घेण्यात वॉर्न चांगलाच पटाईत होता. त्या दिवशी इंग्लंडचा फलंदाज माइक गेटिंगलाही त्याने असाच चेंडू फेकला होता. मात्र वॉर्नच्या बोटांची कला, पिचवरील ओस, चेंडूची एका बाजूची शाइन या सर्वांचा असा काही मिलाप झाला की, चेंडू लेग स्टम्पवर पडून थेट ऑफ स्टम्पवर जाऊन आदळला.

या डिलिव्हरी नंतर वॉर्न, गेटिंग, ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मैदानात बसलेले क्रिकेटचे चाहते आश्चर्यचकीत होऊन पाहायला लागले. गोलंदाज तज्ज्ञांनी सांगितले की, वॉर्नने ९० च्या कोनापेक्षाही अधिक कोनात चेंडू फिरवला होता. या चेंडूची चर्चा अनेक दिवस क्रिकेट जगतात रंगली. त्यानंतर काही दिवसांनी या चेंडूला 'बॉल ऑफ सेंच्युरी' म्हणून घोषित करण्यात आले.

वॉर्नने त्याच्या काळातील जवळपास सर्वच दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

12 तासांपूर्वी ट्विट करून रोडे मार्श यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला…

वॉर्नने 12 तासांपूर्वी शेवटचे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी रोडे मार्श यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'ते आमच्या संघाचे महान खेळाडू होते. त्यांनी अनेक तरुण मुला-मुलींना प्रेरणा दिली.'

SCROLL FOR NEXT