Latest

Pakistan election | पाकिस्तानात शरीफ- भुट्टो यांच्यात सत्ता स्थापनेबाबत ठरलं! इम्रान खान काय भूमिका घेणार?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानमधील 'डॉन' वृत्तपत्राच्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या समर्थक उमेदवारांनी ९९ जागांवर विजय मिळविला आहे. नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने ७१ जागा जिंकल्या आहेत. तर बिलावल भुट्टोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ५३ उमेदवार विजयी झाले आहेत. जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ) पक्षाला २ जागा आणि निवडून आलेल्या इतरांची संख्या ३३ आहे. मतदान संपल्यानंतर ४० तास उलटूनही अद्याप १५ जागांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. (Pakistan election)

Geo News च्या वृत्तानुसार, 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ 'चे (पीएमएल-एन) अध्यक्ष शेहबाज शरीफ यांनी पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो आणि माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट घेतल्यानंतर पीएमएल-एन आणि पीपीपी यांचे केंद्रात आणि पंजाबमध्ये आघाडी सरकार स्थापन करण्यावर एकमत झाले आहे.

शेहबाज यांनी पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांच्या निवासस्थानी पीपीपीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, शेहबाज यांनी झरदारी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा केली आणि पीएमएल-एनचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांचा संदेशही दिला. शेहबाज यांनी पीपीपीच्या दोन्ही नेत्यांना पाकिस्तानमधील राजकीय आणि आर्थिक स्थैर्यासाठी पीएमएल-एन नेतृत्वासोबत जाण्यास सांगितले.

भुट्टो आणि शेहबाज यांनी पंजाब आणि केंद्रात युती सरकार स्थापन करण्यास सहमती दर्शविल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. दोन्ही पक्ष पुढील बैठकीत त्यांची भूमिका मांडतील आणि सत्तावाटपाच्या फॉम्युर्ल्याबाबत सर्व बाबींना अंतिम रूप देतील आणि कोणाला कोणते मंत्रिपद? यावर शिक्कामोर्तब होईल, असे ठरले आहे. ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, मॉडेल टाऊनमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना नवाझ शरीफ यांनी दावा केला की, निवडणुकीत पीएमएल-एन सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावेळी शेहबाज शरीफ, पीएमएल-एनच्या मुख्य संघटक मरियम नवाज आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.

"देशाला भोवऱ्यातून बाहेर काढणे हे आपले कर्तव्य आहे असे मला वाटते; पाकिस्तानला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन देतो. आपण एकत्र बसू. कारण देशासाठी कोणी काय केले हे सर्वांना माहीत आहे." असे ते म्हणाले. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पुढे म्हणाले की प्रत्येकाला पीएमएल-एनची पार्श्वभूमी माहित आहे आणि " देशाला भोवऱ्यातून बाहेर काढणे हे आमचे कर्तव्य आहे". (Pakistan election)

पीटीआयने बोलावली बैठक

दरम्यान, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांनी सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन केले. त्यांनी दावा केला की फॉर्म-४५ डेटानुसार त्यांचा पक्ष नॅशनल असेंब्लीतील सुमारे १७० जागा जिंकत आहे. दरम्यान, पीटीआय पक्षाने इतर पक्षांसोबत युती करण्याबाबत चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. पीटीआयने शुक्रवारी सांगितले होते की ते केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहे आणि त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) यांच्याशी युती करण्याची शक्यता नाकारली होती. बॅरिस्टर गोहर यांनी जिओ न्यूजशी बोलताना स्पष्ट केले आहे की, ते पीपीपी अथवा पीएमएल-एनच्या संपर्कात नाही.

दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल देशवासीयांचे अभिनंदन केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT