Latest

Share Market Closing Bell | तेजीला ब्रेक! सेन्सेक्स १६१ अंकांनी घसरून बंद, Go First दिवाळखोरीमुळे ‘या’ बँकांचे शेअर्स गडगडले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक नकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारातील ८ दिवसांतील तेजीला आज ब्रेक लागला. सुरुवातीला सेन्सेक्स (Sensex) सुमारे ३०० अंकांनी घसरुन ६१ हजारांवर आला. तर निफ्टी (nifty today) ९४ अंकांच्या घसरणीसह १८ हजारांवर होता. त्यानंतर बाजार बंद होईपर्यंत ही घसरण कायम राहिली. (Share Market Closing Bell) सेन्सेक्स १६१ अंकांनी घसरून ६१,१९३ वर बंद झाला. तर निफ्टी ५७ अंकांच्या घसरणीसह १८,०८९ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात फायनान्सियल आणि आयटी स्टॉकचे नुकसान झाले.

सेन्सेक्सवर (bse sensex today) भारती एअरटेल, टेक महिंद्रा, टीसीएस, अॅक्सिस बँक, एलटी, बजाज फायनान्स, विप्रो, रिलायन्स, सन फार्मा, एचसीएल टेक, टाटा स्टील, इन्फोसिस हे शेअर्स घसरले. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, आयटीसी, कोटक बँक, एचडीएफसी बँक, मारुती या शेअर्सनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला.

Go First दिवाळखोरीत, 'या' बँकांचे शेअर्स गडगडले

एअरलाइन गो फर्स्टच्या दिवाळखोरी प्रक्रियेमुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि आयडीबीआय बँकेचे शेअर्स घसरले. यामुळे त्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात सुमारे ७,५०० कोटींहून अधिक घट झाली. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, ॲक्सिस बँक या Go First च्या कर्ज पुरवठादार बँका आहेत. तर दुसरीकडे गो फर्स्टचे प्रतिस्पर्धी इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो), स्पाइसजेट आणि जेट एअरवेजचे शेअर्स वधारले. सुरुवातीला इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअरने ५ टक्क्यांहून अधिक तर जेट एअरवेजच्या शेअरने ५ टक्क्यांने वाढून व्यवहार केला.

PSU Bank स्टॉक्सला फटका

Nifty PSU Bank स्टॉक सुमारे १ टक्क्यांनी खाली आले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शेअर सुमारे ५ टक्क्यांनी घसरला. बँक ऑफ बडोदाचा शेअर २.७४ टक्क्यांनी खाली आला. पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया हे शेअर्सदेखील आज घसरले. Manappuram Finance, जिंदाल सॉ, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी हे शेअर्सदेखील आज घसरले होते. या शेअर्सची घसरण ५ टक्क्यांपर्यंत होती.

अमेरिका, आशियातील बाजार कमजोर, गुंतवणूकदारांची सावध भूमिका

अमेरिकेत मंदीच्या धास्तीने येथील शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी कमजोरी दिसून आली. येथील डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज निर्देशांक १.०८ टक्क्यांनी घसरला. एस अँड पी ५०० निर्देशांक १.१६ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट १.०८ टक्क्यांनी खाली आला. आता गुंतवणूकदारांचे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयाकडे लागले आहे. यामुळे त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. आशियाई बाजारातही कमकुवत स्थिती दिसून आली. दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.७ टक्के, हाँककाँगचा हँग सेंग १.२ टक्क्यांनी घसरला.

FPI चा भारतीय बाजारात ओघ कायम

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) भारतीय बाजारात निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. त्यांनी मंगळवारी भारतीय शेअर्समध्ये १,९९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ३९४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT