Latest

राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट, डाव्या पक्षांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जावे : शरद पवार

अविनाश सुतार

कराड : पुढारी वृत्तसेवा: आगामी निवडणुकांना सामोरे जाताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, डावे पक्ष यांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जावे, या संदर्भात प्रत्यक्ष बसून मतदारासंघनिहाय चर्चा व्हावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आज (दि.५) कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रातील मोदी सरकारकडून तपास यंत्रणेचा होणारा गैरवापर, खा. संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाई, नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आरोप, यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पवार म्हणाले, तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणला जात आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई याचाच एक भाग आहे. शिक्षण क्षेत्रात सिसोदिया यांनी उत्तम काम केले आहे. लिकर संदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. वास्तविक दिल्लीमध्ये लिकरवर मोठ्या प्रमाणात कर आकारला जात होता. तो कर कमी केल्यामुळे चोरटी अयात थांबली. हा निर्णय महाराष्ट्रात सुध्दा झाला होता. मात्र, या निर्णयावरून कारवाई करून त्यांना अटक झाली. अशा पध्दतीने कारवाई होण्याचे प्रकार हे भाजपविरोधी नेत्यांवर सुरू आहेत. आठ राज्यात वेगवेगळ्या नेत्यांवर अशा पध्दतीने कारवाई झाली आहे. कारवाई झालेल्या नेत्यांची यादी पंतप्रधानांना पत्राद्वारे पाठवली आहे. या यादीतील अनेक नेते असे आहेत की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई काढून घेण्यात आली आहे, हा धक्कादायक प्रकार आहे. हे योग्य नाही.

संजय राऊत यांच्याविरोधात सुरू असणार्‍या हक्कभंग कारवाईबाबत विचारले असता पवार म्हणाले, हक्क समिती स्थापन करण्याचे अधिकार विधानसभेला आहेत. परंतु, संजय राऊत यांच्यावर कारवाईसाठी आक्रमक आणि आग्रही असणार्‍यांची समितीत झालेली नेमणूक ही पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणारी आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT