Latest

शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ना. धों. महानोर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आज पळसखेड येथील त्यांच्या शेतातील आनंदयात्री या निवासस्थानी घेतली. यावेळी त्यांच्या सोबत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, रंगनाथ काळे, माजी आमदार किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुधीर भोंगळे, विजय बोराडे, ॲड. रविंद्र पाटील, संजय गरुड, डि. के. पाटील, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

यावेळी शरद पवारांनी ना. धों. महानोर यांचे चिरंजीव बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर, भाऊ पुंडलिक महानोर, मुली मिरा, सरला, रत्ना व नातु शशीकांत व नातवंड यांच्याशी पारिवारिक संवाद साधला. आनंदयात्री या निवासस्थानी जवळपास अर्धा तास कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली.

पळसखेडचे भुमिपुत्र कविवर्य ना. धों. महानोर व वाकोदचे उद्योजक भवरलाल जैन हे दोघंही माझे सहृदयी मित्र. दोघांनी शेत, शेती, माती आणि पाणी यासाठी आयुष्यभर व्रतस्थपणे कार्य केले. दोघं आता नाहीत मात्र त्यांचे कार्य हे शाश्वत आहे. कविवर्य ना. धों. महानोरांविषयी बोलताना साहित्य, शेती आणि फळबागांच्या धोरणांवर शरद पवार यांनी मैत्रीपूर्ण आठवणी सांगितल्या. निसर्ग जवळून बघितला तेच त्यांच्या साहित्यात उतरले. त्यामुळेच शेतीविषयी वस्तुनिष्ठ धोरणांवर ते विधान परिषदेत भाष्य करत, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

यावेळी कवी ना.धों महानोर यांना अभिवादन करताना शरद पवार.
यावेळी शरद पवार यांनी कवी ना.धों महानोर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

पाणलोट कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचा होता आग्रह

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व राजकीय माध्यमातून त्यांनी वाचा फोडल्याचे शरद पवार म्हणाले. 1980 साली जळगाव पासून जी शेतकरी दिंडी काढण्यात आली. त्याच्या आयोजनामध्ये कवी ना. धो. महानोर यांचा पुढाकार होता. जळगाव ते नागपूर अशा निघालेल्या या दिंडीमध्ये मा. यशवंतराव चव्हाण साहेब, प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख व मी स्वतः तसेच प्रल्हादभाऊ पाटील व अनेक मान्यवर नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जावा असा आग्रह कवि ना. धों. महानोर यांनी धरून विधानपरिषदेत पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण, मृदसंधारण आणि बंधा-यांची साखळी उभी करण्याचा आग्रह धरला. त्यांनी स्वतः पळसखेडे आणि वाकोदच्या परिसरात बंधा-याची साखळी उभी करून दाखवली. रोजगार हमी योजनेशी निगडित शंभर टक्के शासकीय अनुदानावरती जी फळबाग योजना 1990-91 मध्ये महाराष्ट्रात राबविण्यास प्रारंभ केला. या योजनेची मांडणी करण्यात ही कवि ना. धों. महानोरांचा पुढाकार होता. शेती, पाणी, फळबागा व वनीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्याचा फायदा संपूर्ण राज्याला कसा होईल, हे त्यांनी आवर्जून बघितले असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT