पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "एका व्यक्तीने हिंदुंवरील झालेले अत्याचार दाखवत एक चित्रपट (द काश्मीर फाईल्स) तयार केला. यावरून लक्षात येते की, बहुसंख्यांक नेहमीच अल्पसंख्याकांवर हल्ला करतात. जेव्हा मुस्लीम बहुसंख्यांक होतो तेव्हा हिंदू समुदाय असुरक्षित होतो. दुर्दैव हे आहे की, सत्तेवर बसलेले केंद्रातील लोक या चित्रपटाचा प्रचार करत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली जात आहे" अमरावती येथे पक्षाच्या समर्थकांना मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते.
द काश्मीर फाईल्स चित्रपटाचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले की, "धार्मिक आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चित्रपटात दाखविण्यात आलं की, काश्मीर पंडितांवर कसे अत्याचार करण्यात आले. बहुसंख्य समुदाय अल्पसंख्यांकावर हल्ला करतो. जेव्हा अल्पसंख्य बहुसंख्यांक होतो, तेव्हा आधीचे बहुसंख्यांक स्वतःला असुरक्षित मानू लागतो. हे सर्व नियोजनबद्ध होत असते."
शरद पवार यांनी देशातील सांप्रदायिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "भाजपा काश्मिरी पंडितांवरील हल्लाच्या जबाबदारीपासून पळू शकत नाही. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली जात आहे, ही बाब चिंताजनक आहे. जे लोक समाजाच्या सर्व वर्गांच्या हिताच्या संरक्षणावर विश्वास ठेवतात, त्यांनी एकत्र आलं पाहिजे. जाती आणि धर्माच्या आधारावर फूट पाडणाऱ्यांविरोधात एकत्रितपणे संघर्ष केला पाहिजे.
"हिंदू आणि मुस्लीम, दलित, बिगर दलित यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्याला त्याची चौकशी करायला हवी. राज्यात महाविकास आघाडीच्या हातात सत्ता आहे; पण, ही परिस्थिती सोपी नाही. सत्तेपासून दूर झालेल्या लोक हे सरकार पाडण्यासाठी हपापलेले आहेत. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत राज्यातील सत्तेला अस्थिर कऱण्याचा प्रयत्नात आहेत.
हे वाचलंत का?