Latest

Kalyani Deshpande :संभाजीनगरात ‘कल्याणी इज बॅक’ : देशभरात २५३ एजंट नेमून सेक्स रॅकेट चालवणारी ‘कल्याणी’ कोण?

अविनाश सुतार


छत्रपती संभाजीनगर : रशिया, दुबई, थायलंड, उझबेकिस्तान, बांगलादेश, पाकिस्तानसह दिल्ली, कोलकत्ता येथील तरुणींना आणून वेश्या व्यवसाय चालविणारी कल्याणी ऊर्फ जयश्री ऊर्फ टीना उमेश देशपांडे (वय ५२) ही मोक्कांतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) शिक्षा झालेली महाराष्ट्रातील पहिली महिला आहे. पाच महिन्यांपूर्वी जेलमधून सुटल्यावर तिने 'लेडी डॉन कल्याणी इज बॅक', असे व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवून या गोरखधंद्यात पुन्हा नव्याने एन्ट्री केली. Kalyani Deshpande

अवघ्या पाच महिन्यांतच तिने देशभरात २५३ ब्रोकरचे नेटवर्क उभे केले. ऑल इंडिया फ्रेंड्स नावाने व्हॉट्सअॅपवर ती त्यांचा ग्रुप चालविते. देशभरातील सर्व मेट्रो सिटीसह छोट्या-मोठ्या शहरांमध्येही तिचे दलाल काम करतात, यावरून ती या दलदलीत किती खोलवर फसली आहे, याचा अंदाज येतो. पुण्यातून चालणाऱ्या या रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आणि कल्याणीला पुन्हा जेलची हवा खायला पाठविले. Kalyani Deshpande

१३ जानेवारीला सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पंकज मोरे यांच्या पथकाने एन-७, सिडको भागातील एका इमारतीत छापा मारून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला होता. तेथून प्रा. सुनील तांबट, संदीप पवार आणि ज्योती साळुंके यांना पकडले. रात्रीची वेळ असल्याने ज्योतीला नोटीस दिली आणि प्रा. तांबट व पवारला अटक केली. दुसऱ्या दिवशी प्रा. तांबटने भाडेकरारनामा सादर करून, या प्रकरणातून जामीन मिळविला, पण त्याचा आरोपींमध्ये समावेश कायम आहे. हे प्रकरण डीसीपी नवनीत काँवत (आयपीएस) यांनी अजेंड्यावर घेत पोलिस कोठडीत असलेल्या संदीप पवारची चौकशी केली. त्याच्या चौकशीत शहरातील सेक्स रॅकेटचा माफिया कुख्यात तुषार राजपूतचे नाव समोर आले. त्यावरून १६ जानेवारीला बीड बायपासवरील सेनानगरात छापा मारला. तेथून उझबेकिस्तानची एक व दिल्लीच्या दोन अशा तीन पीडितांची सुटका केली.

पोलिसांनी तुषार राजन राजपूत, प्रवीण बालाजी कुरकुटे, गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव, लोकेशकुमार केशमातो (३५), अर्जुन भुवनेश्वर दांगे (३८, दोघे रा. झारखंड) या पाच जणांना अटक केली. पहिल्या आरोपीच्या कबुलीनंतर दुसरा छापादेखील यशस्वी झाल्याने उपायुक्त काँवत आणि निरीक्षक बागवडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातले. त्यात बागवडे या तपास अधिकारी असल्याने त्यांनी या गोरखधंद्याची पाळेमुळे किती खोलवर रुतली आहेत, याचा शोध सुरू केला. राजपूत आणि टोळीला सुरुवातीला चार दिवस, त्यानंतर पुन्हा चार, अशी आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

यादरम्यान त्यांनी राजपूतच्या पुढची लिंक म्हणजे, पुण्याची कुख्यात लेडी डॉन कल्याणी देशपांडे हिचे नाव निष्पन्न केले. ही माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांना दिली. २० जानेवारीला गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी पुण्यात छापा मारून कल्याणीला ताब्यात घेतले. त्याच दिवशी सिडको पोलिस ठाण्याच्या हवाली केले. बागवडे यांनी तिला २१ जानेवारीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गांभीर्य ओळखून तिला तब्बल १० दिवसांची, म्हणजे ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. एन-७ मध्ये एका गाळ्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा मारून पोलिस राजपूतची शिडी बनवून पुण्याच्या कल्याणीपर्यंत पोचले. पोलिसांनी आताशी एक सिंडिकेट उघड केले आहे. हे जाळे देशभर प्रचंड मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. अनेक शहरांमध्ये त्यांनी बस्तान बसविलेले आहे. ते मोडीत काढणे, शक्य नाही, असा दावा या सिंडिकेटमधील प्रत्येकजण छातीठोकपणे करतो, यावरून त्यांची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा अंदाज बांधता येतो.

Kalyani Deshpande डान्सबारमध्ये काम ते सेक्स रॅकेटचा दलाल

३ डिसेंबर १९८२ रोजी जन्मलेल्या तुषार राजपूतचे वडील कामगार विभागात शिपाई होते. सरकारी नोकराचा मुलगा असला तरी तुषार हा सुरुवातीपासूनच वाह्यात निघाला. तो शहरातील एका हॉटेलमध्ये कामाला लागला. तेथे डान्स बार चालत असल्याने तो तिकडे आकर्षित झाला. हॉटेलात येणाऱ्या राज नावाच्या तरुणाच्या तो चांगल्या ओळखीचा झाला. राज कुंटणखान्याची दलाली करायचा. डान्सबारमुळे तो या हॉटेलात यायचा. तुषार आणि राजची चांगली गट्टी जमली आणि त्यांनी जोडीने कुंटणखाने चालवायला सुरुवात केली. या रॅकेटमध्ये राज गुरू असला, तरी चालाख तुषारने त्याला केव्हाच मागे टाकले. कालांतराने राज बाजूला झाला अन् तुषार मात्र या धंद्यात फार पुढे निघून गेला. लग्न, संसार, मुले, घर-दार सर्व काही असताना तो या धंद्यातून बाहेर पडायला तयार नाही. कारवाई झाल्यावर बदनामीमुळे या धंद्यावरून घरी अनेकदा वाद होतात, पण चटक लागली… समोर पैसा दिसतोय, त्यामुळे तुषार यातून बाहेर पडायला तयार नाही. तो या धंद्यात प्रत्येकवेळी नवनवीत मित्र जोडत गेला. आरोपी प्रवीण कुरकुटे हादेखील त्याला असाच भेटलेला आहे.

आता प्रवीण जालना, बीड, धाराशिव, नांदेड आदी जिल्ह्यांसह मराठवाड्यातील ग्राहक सांभाळतो, तर तुषार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्राहक सांभाळून पुणे, मुंबई, दिल्लीसह आंतरराष्ट्रीय एजंटांशी संपर्क ठेवून असतो. यातून त्याने गडगंज संपत्ती मिळविली आहे. कामगारांच्या नावाने खाते उघडून त्यावरून व्यवहार करणे, घर, जमिनी त्यांच्याच नावाने खरेदी करणे असे अनेक कारनामे आता त्याने सुरू केले आहेत. त्याचे स्वत:चे राहते घर त्याच्याकडे काम करणाऱ्या एका मजुराच्या नावावर आहे. तरुणी गरिबीतून यात स्वेच्छेने येतात, असा त्यांचा दावा आहे, पण आलेली तरुणी यातून माघारी जाऊ नये, म्हणून हे दलाल आधीपासूनच जाळे टाकून असतात. तिचे फोटो काढून ठेवणे, व्हिडीओ बनविणे, तिला नशेच्या आहारी लावणे असे गैरउद्योग ते सतत करीत असतात.

कुंटणखान्यातून तिला पैसा मिळतोय हे दाखवितात, पण तेथेच तिला नशा करायला लावून तिचेच पैसे खर्च करतात. महिन्याला लाखो कमाई असलेल्या तरुणीला नशापाणी करून हे २० ते २५ हजारांवर आणून ठेवतात. स्वत: मात्र लाखो कमावतात आणि तरुणींचा आर्थिक व शारीरिक छळ करतात. राजपूतने वेश्याव्यवसायातून कमावलेले २८ लाख रुपये पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी मंगळवारीच फ्रीज केले. त्याच्या २ चारचाकी आणि २ दुचाकीही जप्त केल्या आहेत. यापूर्वी अनेकदा राजपूत पोलिसांच्या जाळ्यात आला, पण त्याच्यावर एवढी कठोर कारवाई यापूर्वी कधीही झाली नाही. पुण्याच्या कल्याणीवर मोक्का लावून तिला शिक्षेपर्यंत नेले, तसेच राजपूतच्या टोळीवरही संभाजीनगर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव बनविला आहे.

Kalyani Deshpande : कल्याणीचा प्रदर्शित न झालेला अडीच कोटींचा सिनेमा

कल्याणी देशपांडे ही ब्युटी पार्लर चालविणारी एक सर्वसाधारण महिला. तिचा पती रिक्षा चालवायचा. बाणेर भागात ते राहायचे. तिच्याकडे येणाऱ्या ग्राहक महिलांमधील कावेरी नावाची महिला तेव्हा हा धंदा करायची. एकदा कल्याणीच्या मुलाच्या अंगावर गरम भाजी पडल्याने तो भाजला. त्याच्या उपचारासाठी कल्याणीला पैशांची गरज पडली. तिने कावेरीकडे हात पसरले. कावेरीने तिला पैसे दिले, पण पैसे कमवायचा मार्ग म्हणून या धंद्याची माहिती दिली. यात पैसे दिसल्यावर कावेरीपेक्षा शार्प असलेल्या कल्याणीने सेक्स रॅकेटमध्ये उडी घेतली. पाहता-पाहता कल्याणी या धंद्यात सर्वांनाच माहिती झाली. मग तिने एकापेक्षा अधिक तरुणी गोळा करून, त्यांच्याकडून हे रॅकेट चालवायला सुरुवात केली.

या धंद्यात ब्रोकर नेमायची कल्पना कल्याणीनेच महाराष्ट्रात आणली. यातून ती स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आली. वरिष्ठांपर्यंत पोचली. एका कारवाईत पोलिसांनी तिची डायरी जप्त केली, तेव्हा थेट पुणे पोलिस आयुक्तांचा संपर्क क्रमांक तिच्या यादीत सापडला होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कल्याणी रातोरात लेडी डॉन झाली. तिच्यावर २४ गुन्हे दाखल असून, मोक्कांतर्गत तिला शिक्षा झालेली आहे. या ट्रॅजेडीचा तिने अडीच कोटी रुपये खर्चून सिनेमा बनविला, पण मध्येच शिक्षा झाल्यामुळे ती जेलमध्ये गेली आणि तिचा सिनेमा मागे पडला. आता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तिला पुन्हा रेकॉर्डवर आणले आहे. संभाजीनगरच्या टोळीसोबत तिला आरोपी केले आहे. जेलमधून सुटल्यावर तिने बिनधास्तपणे लेडी डॉन कल्याणी इज बॅक, असे स्टेट्स ठेवले होते, पण पाच महिन्यांतच तिचे पुन्हा दिवस फिरले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT