Latest

Gujarat | गुजरातमध्ये मोठी दुर्घटना! नर्मदा नदीत एकाच कुटुंबातील ७ जण बुडाले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील नर्मदा नदीत एकाच कुटुंबातील सातजण बुडाले आहेत. नर्मदा जिल्ह्यातील पोइचा गावात मंगळवारी ही घटना घडली. हे सर्वजण नदीत आंघोळीसाठी उतरले होते. त्यानंतर ते सर्वजण बेपत्ता झाले. एनडीआरएफ आणि वडोदरा अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे सातजण ​​नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वडोदरा आणि नर्मदा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या पोइचा येथे सुरतमधील एक कुटुंब आले होते. त्यानंतर मंगळवारी दुपारी आंघोळीसाठी ते नदीत उतरले होते. त्यानंतर ते बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वडोदरा जिल्ह्यातील जरोड येथील ६बीएन एनडीआरएफची एक तुकडी बेपत्ता झालेल्या सात जणांच्या शोध घेण्यासाठी मंगळवारी दुपारी पोइचा येथे पोहोचली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

नेमकी घटना काय?

ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नर्मदा शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ६ मुले आणि त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. मुलांचे वय ७ ते १५ वर्षांच्या दरम्यान असून पुरुषाचे वय ४५ वर्षे आहे. हे सर्वजण १७ लोकांच्या गटाचा एक भाग आहेत जे सुरतहून आले होते. एका मंदिरात पूजा केल्यानंतर हे सर्वजण नर्मदा नदीत आंघोळ करण्यासाठी पोइचा गावात गेले होते. राजपीपला शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक जलतरणपटू त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भरत बडालिया (वय ४५), अर्णव बडालिया, मित्राक्ष बडालिया, व्रज बडालिया, आर्यन जिंजला, भार्गव हादिया आणि भावेश हादिया अशी त्यांची नावे आहेत. ते सुरत येथील कृष्णा पार्क सोसायटीत राहत होता आणि ते अमरेली येथील रहिवासी आहेत.

नर्मदा नदीत पोहण्यासाठी पोइचा हे उन्हाळी सहलीसाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. नर्मदा जिल्हा प्रशासनाने नुकतेच स्थानिक बोट चालकांना नदीत परवान्याशिवाय बोटी चालवण्यास मनाई केली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT