Latest

लेटलतिफ ’सेट’ला नेमका मुहूर्त कधी? 2022 ची परीक्षा यंदा मार्चमध्ये घेतली

अमृता चौगुले
गणेश खळदकर 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेली स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट (सेट) महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत घेण्यात येते. संबंधित परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. मात्र, ही परीक्षा 2022 ची होती. त्यामुळे 2023 मध्ये घेण्यात येणार्‍या 'सेट'ला नेमका मुहूर्त कधी? असा प्रश्न परीक्षा देणार्‍या इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 26 मार्च 2023 ला सेट घेण्यात आली आणि या परीक्षेचा निकाल 27 जून 2023 ला जाहीर करण्यात आला. परंतु ही सेट ही 2022 मध्ये घेण्यात येणारी होती. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीकडून सेट घेण्यासंदर्भात दिलेली मुदत संपल्यामुळे विद्यापीठाला 2022 मध्ये सेट घेता आली नव्हती. त्यामुळे 2022 मध्ये सेट न घेता ती 26 मार्च 2023 ला घेण्यात आली. आता मात्र पुढील पाच वर्षांसाठी सेट घेण्याची विद्यापीठाला परवानगी मिळाली आहे.
त्यामुळे 2023 या वर्षात घेण्यात येणारी सेट परीक्षा नेमकी कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठाकडे सेट परीक्षा घेण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत पुन्हा एकदा सेट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सेट ही मर्ज करण्याची कोणतीही नियमावली नाही. त्यामुळे विद्यापीठाला यावर्षीची सेट  घेणे अनिवार्य आहे. 2013 मध्येदेखील सेट दोनदा घेण्यात आली होती.17 फेब—ुवारी आणि 1 डिसेंबरला वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यात आली. फेब—ुवारी महिन्यात झालेली परीक्षा 2012 ची होती. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे एमएच सेट 2023 कडे डोळे लागले आहेत.

पात्र होणार्‍यांमध्ये पुरुष अधिक

नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या सेटसाठी 1 लाख 19 हजार 813 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 51 हजार 512 पुरुष उमेदवार होते. त्यापैकी 43 हजार 517 उमेदवारांनी परीक्षा दिली. तर 3 हजार 570 उमेदवार सेटमध्ये पात्र झाले. त्यांची टक्केवारी 8.20 होती. तर 68 हजार 276 महिला उमेदवार होत्या. त्यापैकी 57 हजार 723 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातील 3 हजार 104 महिला उमेदवार पात्र ठरल्या. त्यांची टक्केवारी 5.38 होती. तर 17 तृतीयपंथी उमेदवारांनी परीक्षा दिली त्यातील दोन उमेदवार पात्र ठरले आहेत. सेट परीक्षेत पुरुष उमेदवारांचा दबदबा असल्याचे पहायला मिळाले.
सेटचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. संबंधित परीक्षा 2022ची होती. त्याच्या प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. 2023 मध्ये जी सेट घेणे अपेक्षित आहे त्या परीक्षेचे नोव्हेंबर महिन्यात आयोजन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे.
– डॉ. प्रफुल्ल पवार, 
कुलसचिव तथा सदस्य सचिव, 
सेट परीक्षा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT