Latest

सीरम थांबवणार ‘कोव्‍हिशील्‍ड’चे उत्‍पादन; जाणून घ्‍या काय आहे कारण…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंध लस उत्‍पादक कंपनी 'सीरम इन्‍स्‍टिट्यूट ऑल इंडिया'ने आता 'कोव्‍हिशील्‍ड'चे उत्‍पादनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात ही लस सर्वसामान्‍य भारतीयांसाठी वरदान ठरली होती. मागील काही दिवस कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. त्‍यामुळे कंपनीने कोव्‍हिशील्‍ड लस उत्‍पादन थांबविण्‍याचा निर्णय घेतला आहे.

'कोव्‍हिशील्‍ड'चे २० कोटी डोस उपलब्‍ध

सीरम इन्‍स्‍टिट्यूट ऑल इंडियाकडे सध्‍या 'कोव्‍हिशील्‍ड'चे २० कोटींहून अधिक डोस तयार आहेत. त्‍यामुळे कंपनीने आता नवीन उत्‍पादन थांबवले आहे. यासंदर्भात एका कार्यक्रमात बोलताना 'सीरम'चे सीईओ अदार पुनावाला म्‍हणाले, "आमच्‍याकडे 'कोव्‍हिशील्‍ड'चे २० कोटी डोस उपलब्‍ध आहेत. मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला आहे. त्‍यामुळे आता आम्‍हाला डिसेंबरमध्‍ये उत्‍पादन थांबवावे लागेल".

जे कोरोना प्रतिबंधक डोसपासून वंचित आहेत, त्‍यांना मोफत लस देण्‍याची तयारीही दर्शवली असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी नमूद केले. जगभरात आता कोरोना आणि हाँगकाँग वगळता बुस्‍टर डोसची गरज कमी असल्‍याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे जगभरात लसींच्‍या उत्‍पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. देशातील लोकसंख्‍येला पुरेसा पुरवठा होण्‍यासाठी सीरम व अन्‍य स्‍थानिक औषध कंपन्‍यांच्‍या निर्यातीवर सरकारने बंदी घातली होती. देशात दोन डोस घेतलेल्‍यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. आता सरकारने दुसर्‍या डोसनंतर ९ महिन्‍यांनी बुस्‍टर डोस घ्‍यावा, असे आवाहन केले आहे. हा कालवधी सहा महिने करावे, अशी अपेक्षाही अदार पुनावाला यांनी या वेळी व्‍यक्‍त केली.

पुनावाला यांनी दिलेल्‍या माहितीमुळे जगभरात आता कोरोना प्रतिबंधक लसींची पुरवठा अधिक असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. जगभरात अनेक औषध कंपन्‍यांनी कोरोना लसीमध्‍ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. मात्र आता मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्‍याने जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंध लस उत्‍पादक कंपनी 'सीरम इन्‍स्‍टिट्यूट ऑल इंडिया'ने डोस उत्‍पादन बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT