Latest

काँग्रेसमध्ये गळती सुरूच; देशाच्या पहिल्या गव्हर्नर जनरलच्या नातवाची काँग्रेसला सोडचिठ्ठी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर देखील काँग्रेसमध्ये ज्येष्ठ, प्रमुख नेत्यांची गळती सुरूच आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. सध्या देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीआर केसवन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सीआर केसवन यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला असल्याचे त्यांनी स्वत: ट्विट करून सांगितले आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खर्गे यांना लिहलेल्या राजीनामा पत्रात सीआर केसवन यांनी लिहिले की, गेल्या दोन दशकांपासून ते पक्षासाठी काम करत आहेत, परंतु आता त्यांना पक्षासाठी काम करण्यास प्रवृत्त करणारी मूल्ये कमी झाली आहेत. सध्या पक्ष ज्या पद्धतीने दिसत आहे, त्याबद्दल ते सोयीस्कर नसल्याचे देखील केशवन यांनी पत्रात म्हटले आहे.

या कारणास्तव त्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली नाही किंवा भारत जोडो यात्रेतही भाग घेतला नाही, असे देखील केशवन यांनी लिहिले आहे. आता नव्या वाटेवर जाण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच ते पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणतात. केशवन यांनी तामिळनाडू काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्तांकडेही राजीनामा पाठवला आहे. आगामी काळात काय दडले आहे हे त्यांना स्वतःला माहित नाही त्यामुळे सध्या तरी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यास नकार दिला आहे, असेही त्यांनी लिहिले आहे.

सीआर केसवन यांनी २००१ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान त्यांनी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थेचे उपाध्यक्षपदही भूषवले. दरम्यान या पत्रात सीआर केसवन यांनी सोनिया गांधींचे आणि त्यांचे आजोबा सी. राजगोपालाचारी यांचेही आभार मानले आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT