Latest

जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशा पारेख यांच्या कार्याचा गौरव केला. आशा पारेख यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक दशके जनतेचा स्नेह प्राप्त केला आहे. त्यांच्या पिढीतील स्त्रीयांनी प्रतिकूलतेचा सामना करूनही विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान असल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

राष्ट्रपती मुर्मू म्‍हणाल्‍या, सांघिक भावना व कठोर परिश्रमातून चित्रपटाची निर्मिती होते. चित्रपट आणि चित्रपटक्षेत्राची राष्ट्र आणि समाजाच्या निर्माणात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम असल्याने अन्य कलांपेक्षा त्याचा प्रभाव व्यापक आहे. भारतात प्राचीन काळापासून नाटक या दृकश्राव्य कलेस महत्त्व आहे. भरतमुनी यांनी नाटकाचे प्रयोजन हे आनंद देणे, विषाद दूर करणे आणि ज्ञान देणे असे असल्याचे नमूद केले आहे. हेच प्रयोजन चित्रपटासही लागू होते. चित्रपट हा उद्योग आहेत, मात्र त्यासोबतच चित्रपट म्हणजे संस्कृती व जीवनमूल्यांची कलात्मक अभिव्यक्ती आहे, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले.

'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे. १९५४ साली या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली आहे. तर 'दादासाहेब फाळके पुरस्कार' हा भारतीय सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. यंदा आशा पारेख यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

'तानाजी'चित्रपटासाठी अजय देवगन यांना पुरस्कार

बॉलिवूड अभिनेते अजय देवगन यांना 'तानाजी, द अनसंग वोरियर' तसेच सूर्या शिवकुमार यांना 'सोरारई पोटरु' चित्रपटाकरीता उत्कृष्ट अभिनेते म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट हिंदी फिचर फिल्म करीता सोरारई पोटरू तर उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून अपर्णा बालामुरली यांना पुरस्कार देण्यात आला.

मराठी चित्रपटांचा ठसा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात मराठी चित्रपटाचा विशेष ठसा उमटल्याचे दिसून आले. 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार तर, प्रसिद्ध गायक राहुल देशपाडे यांना 'मी वसंतराव' चित्रपटातील गायनासाठी सर्वोत्तम पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'जून' या मराठी चित्रपटातील अभिनयासाठी कलाकार सिद्धर्थ मेनन यांना, तर 'अवांछित' आणि 'गोदाकाठ' चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम यांना 'स्पेशन ज्युरी मेंशन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या मराठी चित्रपटांना पुरस्कार प्रदान 

  • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट-सुमी (दिग्दर्शक-अमोल गोळे)
  • सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- फनरल (मराठी)- विवेक दुबे
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार मराठी चित्रपट- अनिश गोसावी, (चित्रपट- टकटक)
  • आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर (चित्रपट- सुमी)      

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT