Latest

जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे ३ दहशतवाद्यांचा खात्मा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : जम्मू- काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील जोल्वा क्रालपुरा चाडूरा भागात सुरक्षा जवानांना ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. घटनास्थळावरून दहशतवाद्यांकडून ३ एके-५७ रायफल, ८ मॅगझिन आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील जोल्वा क्रालपुरा चाडूरा भागात गुरुवारी (दि.६) मध्यरात्री सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

या भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहिम केली होती. या दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. सुरक्षादलानेही चोख प्रत्युत्तर देत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

घटनास्थळावरून ३ एके-५७ रायफल, ८ मॅगझिन आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता. दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी सध्या संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

काश्मीरचे आयजीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून ठार झालेले सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. आतापर्यंत एकाची ओळख पटली असून तो श्रीनगर शहरातील वसीमचा आहे. घटनास्थळावरून तीन एके-५६ रायफलसह दारुगोळा आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याआधी दक्षिण काश्मीरमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पाकिस्तानी कमांडरसह जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार केले होते. त्यांच्याकडून दोन एम-४ कार्बाइन आणि एक एके ४७ रायफल आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT