Latest

हिंगोली : स्‍कूल बस उलटली; ८ विद्यार्थी जखमी, चालकाचे पलायन

निलेश पोतदार

हिंगोली ; पुढारी वृत्‍तसेवा वसमत तालुक्यातील बाभुळगाव ते वाखारी मार्गावर विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी बस उलटली आहे. या अपघातात 8 विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात आज (बुधवार) सकाळी घडला. सर्व विद्यार्थी वसमतच्या युनिव्हर्सल इंग्लीश स्कुलचे आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.

वसमत येथे युनीव्हर्सल इंग्लीश स्कुल हि केजी ते 10 पर्यंत शाळा आहे. वसमत शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी शाळा प्रशासनाकडूनच बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेच्या बसद्वारेच ये-जा करतात. सकाळी नेहमी प्रमाणे लहान, लोण, वाखारी या भागातील सुमारे 30 ते 35 विद्यार्थी घेऊन बस वसमतकडे निघाली होती. बाभुळगाव ते वाखारी मार्गावर एका वळणावर चालकाने बसचे ब्रेक दाबले. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बाभुळगाव व वाखारी येथील लक्ष्मीकांत नवघरे, नामदेव नवघरे, रामा नवघरे, गोविंद नवघरे, तातेराव कोरडे, गंगाधर ढोरे, गंगाधर बर्वे, सुनील कोरडे, सरपंच गजानन ढोरे, सुनील कोरडे, नारायण कोरडे, नवनाघ नवघरे, लक्ष्मण नवघारे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. आमदार राजेश नवघरे यांनी तातडीने दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून, त्याद्वारे जखमींना वसमतला आणले आहे.

अपघातात जखमी झालेल्या आठ विद्यार्थ्यांना उपचारासाठी वसमत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये हिंदवी कोरडे, अर्जून कोरडे, शिवम कोरडे, आरती कोरडे (सर्व रा. लहान), आर्या बेटकर, तिरुपती कोरडे (रा. हिवरा), लखन गंगावणे (वाखारी), वसंता कोरडे यांचा समावेश आहे. अपघाताला वाहन चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. बसचा चालक वारंवार बदलला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी पालकांनी केला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT