Latest

फडणवीसांनी कामगारांवर मध्यान भोजन योजना लादली : सत्यजित पाटील

अविनाश सुतार

सरुड : पुढारी वृत्तसेवा : बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी मध्यान भोजन योजना कुचकामी आहे. यातून कष्टकरी कामगारांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मर्जीतील ठेकेदाराला पोसण्यासाठीच ही योजना लादल्याचा आरोप माजी आमदार सत्यजित पाटील यांनी केला. असंघटित कामगार या सरकारला धडा शिकवतील. ठाकरे सरकारने सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या सरसकट निर्णयांना स्थगिती दिल्याबद्दल शिंदे सरकारचा पाटील यांनी यावेळी जाहीर निषेध नोंदवला.

सरुड (ता. शाहूवाडी) येथे महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या पुढाकाराने आयोजित कामगार मेळावा आणि पूरक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. संयोजक महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाहूवाडी तालुक्यातील सुमारे २०० हून अधिक संलग्न कामगारांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

सत्यजित पाटील म्हणाले की, समाजाला निवारा उभा करून देणाऱ्या कष्टकरी असंघटित मजूर, कामगारांना बांधकाम संघटनेने ओळख दिली. त्या शिवाय कामगारांचे जगणे सुसह्य केले आहे. असंघटित कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी बांधकाम कामगार संघटनेला ठोस मदत करण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.

जिल्हाध्यक्ष आनंदा गुरव यांनी कामगारांच्या अनेक लाभार्थी मुलांचे विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीचे धनादेश सरकार दरबारी पडून असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात बांधकाम कामगारांना आर्थिक मदतीचे पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. असंघटित घटकांच्या न्याय हक्कांसाठी सरकारशी संघटनेचा लढा सुरूच राहील.

हंबीरराव पाटील, जालिंदर पाटील, दिनकर लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. उपसरपंच भगवान नांगरे, तंटामुक्त अध्यक्ष उत्तम पाटील इतर सदस्य, बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी, तसेच संलग्न कामगार उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT