Latest

सातारा : निवृत्त पोलिसांचे पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन

मोनिका क्षीरसागर

सातारा ; पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यातील निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना निवृत्तीचे वेतन नियमित मिळत नसल्याने आज (शुक्रवार) त्यांनी आंदोलनाचे हत्यार बाहेर काढले आहे. सातारा पोलिस मुख्यालयासमोर एकत्र येत हे आंदोलन केले. या आंदोलनाची परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दरम्यान, पोलिस मुख्यालयातील क्लेरिकल विभागात सुधारणा न झाल्यास पुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी निवृत्त पोलिसांनी दिला आहे.

देशात कुठेही आंदोलन सुरु झाले की ते आंदोलन चिघळू नये. शांततेत आंदोलन व्हावे यासाठी सर्वप्रथम पोलीस त्याठिकाणी तैनात असतात. शुक्रवारी मात्र निवृत्त झालेले सातारचे पोलिसच आंदोलनासाठी एकत्र जमले. रिटायर्ड पोलीसांनी एकत्र येत त्यांनी चर्चा केली. यानंतर मागणीचे निवेदन तयार करुन ते सर्वांसमोर वाचण्यात आले. या निवेदनामध्ये सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांना वेळेत पेन्शन मिळावी, मुख्यालयातील कार्यालयीन कामकाजावेळी माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना लिपीकांकडून सन्मानजनक वागणूक मिळावी, संबंधित टेबलवरच्या मजल्यावर असल्याने तो टेबल खाली ठेवावा. यामुळे वृध्द व आजारी पोलिसांना त्रास होणार नाही, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.

आंदोलनात जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे एक तासभर निवृत्त पोलिस शांततेने एकत्र जमले व त्यांनी आंदोलन करुन आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान, तात्काळ मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी यावेळी दिला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT