पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार ठरविण्यात अपयश आल्याची टीका दैनिक सामनाच्या अग्रलेखातून (Sanjay Raut On Sharad Pawar) करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून 'राष्ट्रवादी' असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. मात्र, शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढं नेणारं नेतृत्व पक्षात उभं राहू शकलं नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते असून त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. असं असलं तरी पक्ष पुढं नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत.
बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो. सर्वांच पक्षातील डरपोक सरदारांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, म्हणजे लोकांना कळेल, खरे मर्द कोण ? भारतीय जनता पक्ष एक पोटदुख्या पक्ष आहे. दुसऱ्यांचे चांगले व्हावे, असे त्यांना कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे. असेही सामनाच्या अग्रलेखात नमूद केले आहे.
सामनामधील अग टीकेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आता महाविकास आघाडीतून बाहेर पडावं वाटतंय,असे म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर राष्ट्रवादीतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीवरून टीका करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या टिप्पणीवरुन ठाकरे गटातून नाराजी व्यक्त केली जात होती. आता सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीवर निशाणा साधण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी (Sanjay Raut On Sharad Pawar) यावर सावध प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सामनाचा अग्रलेख मी वाचलेला नाही. वाचल्यानंतर त्यावर मी मत व्यक्त करेन. कारण 'सामना'चे संपादक आणि आम्ही एकत्र काम करत आहे. त्यामुळे एकत्र काम करत असताना पूर्ण माहिती घेऊन त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. कारण उगीच गैरसमज होऊ शकतात. पण, मला खात्री आहे की, त्यांची भूमिका ऐक्याला बाधा आणणार नाही.
हेही वाचा