तासगाव; पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ येथे कॉलेजला जाण्यासाठी एसटी बस वेळेत नसल्याने पास काढूनही ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून जाण्याची वेळ मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील विद्यार्थ्यांवर आली आहे. सकाळच्या वेळेत एसटीची फेरी सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी करुनही आगारप्रमुखांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. सकाळी कॉलेजच्या वेळेत फेरी सुरु न केल्यास गावामध्ये एसटी रोखून धरणार असल्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
मळणगाव येथील सुमारे १५० पेक्षाही जास्त विद्यार्थी व विद्यार्थींनी उच्च शिक्षणासाठी कवठेमहांकाळ येथे जात असतात. विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेली बस फेरी कोरोना काळात बंद झाली होती. महाविद्यालये पुर्ववत सुरु होताच ब-याच फे-या सुरळीत सुरु झाल्या. पण सकाळी येणारी बस अद्यापही सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी कॉलेजला जाण्यासाठी एसटी वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे आतोनात हाल होत आहेत. परिणामी दररोज सकाळी विद्यार्थ्यांना शिरढोण पर्यंत पायपीट करावी लागते. याबाबत ग्रामपंचायतीने पत्र देऊन सकाळची फेरी सुरु करण्याची मागणी आगार प्रमुखांकडे केली आहे. या पत्रास आगार प्रमुखांनी केराची टोपली दाखवली आहे. सोमवारी विद्यार्थ्यांवर कवठेमहांकाळला जाणा-या ट्रॅक्टरमधून जाण्याची वेळ आली.
मळणगाव येथील विद्यार्थ्यांसाठी सकाळची फेरी सुरु करण्याची विनंती आमदार सुमन पाटील यांनी आगार प्रमुख महेश जाधव यांना केली होती. तरीही फेरी सुरु करण्यात आलेली नाही. काहीतरी कारण सांगून वेळकाढूपणा केला जात आहे.
हेही वाचा :