‘धनुष्यबाण’ गोठविल्याने शिवसेना संपणार नाही | पुढारी

‘धनुष्यबाण’ गोठविल्याने शिवसेना संपणार नाही

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिंदे, ठाकरे या वादात निवडणूक आयोग शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविणार हे आधीपासूनच माहिती होते. त्यामुळे या निर्णयावर आश्चर्य वाटलेले नाही, असे म्हणत हे निर्णय घेतय कोण, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (दि. 9) उपस्थित केला. धनुष्यबाण चिन्ह गेल्याने शिवसेना संपणार नाही, असेही ते म्हणाले.

शरद पवार हे शनिवारपासून औरंगाबाद दौर्‍यावर आहेत. निवडणूक आयोगाने सेनेचे धनुष्यबाण चिन्हासह शिवसेना नाव वापरावरही बंदी घातल्याने यावर माध्यमांनी पवार यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, हे निर्णय कोण घेतय, हे माहिती नाही. चिन्ह असो, नसो निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ही ठेवलीच पाहिजे. नवीन चिन्ह घ्यायचे आणि निवडणुका लढवायच्या.

यापूर्वी आपण स्वत: पहिली निवडणूक बैल-जोडी, दुसरी गाय-वासरू, तिसर्‍यांदा चरखा, चौथ्यांदा पंजा आणि आता घड्याळ चिन्हावर लढलो. शक्तिशाली पक्षाला अशा परिस्थितीत अनेक वेळा विविध चिन्हांवर निवडणूक लढवावी लागते. शिवसेनेप्रमाणेच यापूर्वी काँग्रेसमध्ये असे दोन गट झाले होते. तेव्हा काँगेस (इंदिरा) आणि काँग्रेस (एस) असे नाव वापरले होते. त्यामुळे आता जी पोटनिवडणूक होत आहे. त्यात शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) आणि इतर शिवसेना असे नाव वापरता येऊ शकेल, असा अंदाजही पवार यांनी व्यक्त केला.

Back to top button