Latest

सांगली : सरपंच ते आमदार अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास

निलेश पोतदार

सांगली ; पुढारी वृत्‍तसेवा आमदार अनिल बाबर यांची टेंभू योजनेचे जनक, पाणीदार आमदार अशी ओळख आहे. एकूण चार वेळा ते आमदार होते. मात्र कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनिल बाबर यांना गार्डी गावच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना १९७० साली बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतः ला समाजकामात झोकून दिले.

१९७२ ला नेवरी पंचायत समितीची निवडणूक लागली, त्यावेळी जनतेतून नव्हे तर सरपंच ग्रामचायतींच्या सदस्यांनी मतदान करून पंचायत समितीचा सदस्य निवडून येत असे. त्यावेळी ते खानापूर पंचायत समितीचे सभापती म्हणून निवडून आले. त्यानंतर १९८० मध्ये ते जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी बांधकाम आणि आरोग्य सभापती पद म्हणून सांगली जिल्ह्यात काम पाहिले. १९८२-८३ सालात पूर्वीच्या खानापूर आणि कडेगाव या संयुक्त खानापूर तालुक्यामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सरकारी टँकरने पाणी गावागावात आणि वाड्यावस्त्यांवर पाठवायला लागायचे. त्या काळात खानापूर पंचायत समितीच्या सभापती म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्याकाळात गावात फोन सुद्धा नव्हते. त्यावेळी एस टी च्या कंडक्टर, ड्रायव्हरकडे चिट्ठी द्यायचे , त्याच चिट्ठीवर टँकर पोहोचला का नाही याबद्दल सरपंच, उपसरपंच , पदाधिकाऱ्यांनी सह्या करायच्या आणि परत कंडक्टर , ड्रायव्हर कडून पंचायत समितीकडे मागवायच्या असे अभिनव प्रयोग करून अनिल बाबर यांनी गावागावात आणि वाड्या वास्त्यांवर पाणी पोहोचवले.

त्यानंतर १९९० मध्ये आमदार म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी कृष्णा नदीतून पाणी उचलून जिल्ह्यातील पूर्व भागाला पाणी देण्यासाठी ताकारी योजनेला जन्म दिला. त्याचा सर्वत्र बोलबाला होता. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कडेगाव या दुष्काळी तालुक्यांना कृष्णेचे पाणी कसे मिळेल याचा अभ्यास करून त्यांनी टेंभू जलसिंचन योजनेची निर्मिती केली. ही टेंभू योजना सरकार दरबारी मांडली, मात्र १९९५ ला राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले नाही. त्यामुळे सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजप सरकारच्या युतीने कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करून ही योजना उचलून धरली.

टेंभू योजना शिवसेना-भाजप युती सरकारच्या १९९५ ते ९९ या काळात मंजूर झाल्यानंतरही अनेक वेळा निधी अभावी काम रखडत गेले. त्यानंतर १९९९,२०१४ आणि २०१९ या काळात इथल्या जनतेने त्यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून दिले. खानापूर मतदार संघातील शेवटच्या टोकापर्यंत आणि इथल्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेणार हे त्यांचे स्वप्न होते. वर्षभरापूर्वीच आमदार बाबर यांच्या पत्नी सौ. शोभाताई बाबर यांचे निधन झाले होते. मात्र त्यानंतर स्वतः खचलेले असूनही अत्यंत कर्तव्य कठोरपणे त्यांनी लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता.

टेंभू चे पाणी २०१२ ला या मतदारसंघात आले. मात्र त्यानंतर वेळोवेळी राज्य शासनाकडून निधी मिळवण्यासाठी आमदार बाबर यांनी अनेक वेळा संघर्ष केले. टेंभूचे पाणी आटपाडी, सांगोल्याच्या टोकापर्यंत आणि तासगावच्या लाभक्षेत्रापर्यंत जरी पोचले तरी उर्वरित ४५ गावे लाभक्षेत्रा बाहेर राहिली होती. त्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांना चालून आलेले मंत्री पद, महामंडळाचे पद नाकारून त्यांनी फक्त टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी अखेर पर्यंत शासकीय पातळीवर अहोरात्र प्रयत्न केले.

गेल्या महिन्यातच टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याला अधिकृत मंजुरी मिळाली. त्यामुळे या लाभक्षेत्रा बाहेर राहिलेल्या सगळ्या गावांना आता पाणी मिळणार आहे असे एकीकडे चित्र असतानाच टेंभू योजनेचा जनक मात्र या योजनेला आणि संपूर्ण मतदारसंघाला पोरका करून गेला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT