Latest

Salman Khan | सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण- सहाव्या संशयित आरोपीला हरियाणात अटक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: सलमान खान (Salman Khan) निवासस्थान गोळीबार प्रकरणात सहाव्या संशयित आरोपीला पकडण्यात आले आहे. हरपाल सिंग असे त्याचे नाव आहे. त्याला हरियाणातील फतेहाबाद येथून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. या संदर्भातील माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.

संशयितांच्या चौकशीदरम्यान हरपाल सिंह याचे नाव समोर

एएनआयने वृत्तात पुढे म्हटले आहे की, सलमान खान निवासस्थान प्रकरणातील सहावा आरोपी हरपाल सिंग (३७) याला मुंबई गुन्हे शाखेने हरियाणातील फतेहाबाद येथून अटक केली. आरोपी हरपाल सिंग याने या प्रकरणात अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरी याला आर्थिक मदत केल्याचे तपासातून समोर आले आहे. (Salman Khan) या प्रकरणातील आरोपींना आज (दि.१४) विशेष मोक्का न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती देखील मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे.

निवासस्थानाबाहेर फेरफटका मारण्यास  2-3 लाख रुपये दिले

गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा आणखी एक सदस्य मोहम्मद रफिक चौधरी याच्या चौकशीदरम्यान हरपाल सिंगचे नाव समोर आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. हरपाल सिंगने रफिक चौधरीला सलमान खानच्या निवासस्थानाभोवती फेरफटका मारण्यास सांगितले होते आणि त्याला 2-3 लाख रुपयेही दिले होते, असे पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

एका संशयिताने कोठडीतच जीवन संपवले

14 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर मोटरसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई गुन्हे शाखेने सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील एकाने कोठडीत असतानाच जीवन संपवले आहे.

काय आहे सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण?

  • 14 एप्रिल रोजी मोटरसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी मुंबईतील वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर अंधाधुंद गोळीबार केला. 
  • या प्रकरणात आत्तापर्यंत मुंबई गुन्हे शाखेने सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. 
  • संशयित आरोपींपैकी एकाने कोठडीत असतानाच जीवन संपवले आहे. 
  • या प्रकरणातील आरोपींना आज (दि.१४) विशेष मोक्का न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समोर आले आहे. 

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT