Latest

सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी 'भारतरत्न' तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 'नॅशनल आयकॉन' म्हणुन नियुक्त केले आहे.

बुधवारी नवी दिल्लीतील आकाशवाणी रंग भवन येथे भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुढील ३ वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. देशभरात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विशेषत: २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठया प्रमाणात मतदारांचा सहभाग वाढव‍िण्यासाठी तेंडुलकर यांच्या प्रभावाचा सकारात्मक फायदा होण्याच्या दिशेने त्यांचे ईसीआयचे 'नॅशनल आयकॉन' होणे अधिक महत्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सचिन तेंडुलकर म्हणाले, भारतासारख्या उत्साहपूर्ण लोकशाहीसाठी तरूणांची राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका आहे. क्रीडा सामन्यादरम्यान देशाला प्रोत्साहन देताना, इंडिया.. इंडिया असा जयघोष करणारी 'टीम इंडिया' समृद्ध लोकशाहीला पुढे नेण्यासाठी नक्कीच समोर येईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, त्यासाठी सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मतदानाचा हक्क बजावणे. ज्याप्रमाणे एखादा सामना बघण्यासाठी स्टेडियमवर प्रचंड गर्दी जमते त्याप्रमाणेच प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रावरही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी आणि उत्साह कायम ठेवूया,असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरूण मतदार निवडणुकीत सहभागी होणार, तेव्हाच आपला देश अधिक समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करेल, असे तेंडुलकर म्हणाले.

मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार याप्रसंगी म्हणाले, तेंडुलकर भारताचेच नव्हे तर जागतिक स्तरावरील आदरण‍ीय खेळाडू व्यक्तीमत्व आहेत. त्यांची क्रिकेटची संपूर्ण कारकीर्द प्रशंसनीय उल्लेखनीय, टिमवर्क आणि यशासाठी अथक प्रयत्नांची कटिबद्धता असल्याचे आपण पाहिलेले आहे. यामुळेच ईसीआयची फलंदाजी करण्यासाठी त्यातून मतदांराची संख्या वाढविण्यासाठी ते एक आदर्श पर्याय ठरतील.कुमार यांनी सांगितले की, या तीन वर्षांमध्ये विविध दूरचित्रवाणी वरील टॉक शो, कार्यक्रम आणि डिजिटल मोहिमांव्दारे तेंडुलकर मतदारांमध्ये मतदानाविषयी प्रचार प्रसार करतील. यामाध्यमातून मतदानाचे महत्व आणि देशाच्या भवितव्यासाठी ते क‍िती महत्वाचे आहे हे मतदारांना पटवून सांगतील.

-हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT