Latest

Russia vs Ukraine : रशियन सैन्यांकडून बेछूट गोळीबार, २ दिवस अन्न पाण्याविना, बंकरमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी आर्त हाक

backup backup

संदीप शिरगुप्पे : पुढारी ऑनलाईन डेस्क

२ दिवस अन्न पाण्याविना आहोत, अशी आर्त हाक युक्रेनमधील बंकरमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी दिली आहे. मागच्या ८ ते १० दिवसांपासून युक्रेनच्या (Russia vs Ukraine) सुमी भागात अडकलेले भारतीय विद्यार्थी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, या भागाचा सध्या रशियन लष्कराने ताबा घेत गोळीबार सुरुच ठेवला आहे. कालपासून सुमी भागात जोरदार गोळीबार सुरू आहे. येथील विजपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे येथे अडकून पडलेल्या विद्यार्थांचा संपर्क तुटत चालला आहे. ज्यांचे मोबाईल सुरू आहेत पण त्यांच्याकडे नेटवर्क नसल्याने मोठा गोंधळ सुरू आहे. या दरम्यान पुढारी ऑनलाईनने बंकरमध्ये अडकून पडलेल्या तामिळनाडूची सुयोमा आणि बंगळूरची फातीमा यांच्याशी बातचीत केली.

सुयोमा ही मूळची तामिळनाडूची आहे. ती सध्या वैद्यकीय शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमीमध्ये जवळजवळ भारतीय ६५० विद्यार्थी अडकले आहेत. रशियन लष्कराने सुमीतील सर्वच वाहतूक मार्ग बंद केले आहेत. तर एअर स्ट्राइक केल्याने रेल्वे रुळ पुर्णपणे उखडले आहेत.

Russia vs Ukraine : भारतीय दुतावासाकडून कोणतीही मदत मिळाली नाही

आमच्यावर मोठे संकट आले आहे. अद्यापही भारतीय दुतावासाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर मागच्या ३० तासांपासून आम्हाला पाणी किंवा कोणतेही खाद्य मिळाले नसल्याची खंत विद्यार्थांनी व्यक्त केली. रशियन लष्कराच्या हल्ल्यानंतर जलवाहिनी तुटल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचीही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी बाहेर पडणारा बर्फ गोळा करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

मात्र, विद्यार्थ्यांकडे पुरेसे पाणी साठविण्याचे साधन नसल्याने अडथळे येत आहेत. सुमीतील भारतीय विद्यार्थी खूप घाबरलेले आहेत. अनेक दिवस उलटूनही मदत न मिळाल्याने त्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. ते स्वत;हून बाहेर येण्यासाठी प्रयत्नही करू शकत नाहीत. कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. याचबरोबर पैसे काढण्यासाठी एटीएम बंद आहेत. अद्यापही मुलांना कोणतीही मदत पोहोचलेली नसल्याचे सुयोमा आणि फातीमा यांनी सांगितले.

आम्ही बंकरमध्ये अडकलोय…

सुमी स्टेट युनिव्हर्सिटी हॉस्टेलच्या बंकरमध्ये आम्ही आहोत. येथे जोरदार गोळीबार सुरू आहे. भारतीय विद्यार्थी उणे तापमानात बाहेर जाऊन बर्फ गोळा करत आहेत, जेणेकरून त्यांच्या पाण्याची व्यवस्था होईल. भारतीय विद्यार्थी अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जात असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, छत्तीसगडचे अहमद शेख रजा म्हणतात, बाहेर खूप धोकादायक स्थिती आहे. आमच्यासाठी कोणतीही सुरक्षा नाही. आम्ही बाहेर आलो तेव्हा असे दिसून आले की प्रत्येक छतावर स्नायपर गन तैनात आहेत. हे खूप भीतीदायक आहे.

हरियाणातील सिद्धार्थ गर्गने म्हणाला, येथे बॉम्बस्फोटाचे आवाज येत आहेत आणि सायरनच्या आवाजाने येथे जवळपास दर अर्ध्या तासाने दहशत निर्माण केली जाते. बंगळूरची सुमन म्हणते मला पुढच्या तीन महिन्यांनी वैद्यकीय पदवी मिळणार होती. पण युद्ध सुरू झाल्याने मला पदवी मिळणार की नाही याची चिंता लागून राहिली आहे. सुमीत अडकलेल्या आम्हा सर्वांचे खाण्यापिण्याचे साहित्य संपले आहे. लवकरात लवकर आम्हाला सुमीतून हलवण्यात यावे, अशी विद्यार्थ्यांनी आर्त हाक दिली.

SCROLL FOR NEXT