पुढारी ऑनलाईन: युक्रेनशी युद्ध पुकारल्यानंतर महासत्ता असलेल्या रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे त्याचे आर्थिक स्वास्थ्य बिघडू लागले आहे. रशिया कर्जबुडवे होण्याची भीती अधिकच गडद होत आहे. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (IMF) म्हटले आहे की, रशिया डिफॉल्टर होण्याची खरी शक्यता निर्माण झाली आहे. रशिया जर डिफॉल्टिंग देश झाला तर त्याच्याशी निगडित इतर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
डिफॉल्टर म्हणजे रशिया विविध देश आणि जागतिक वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज आणि त्याचे व्याज वेळेवर फेडू शकणार नाही. यामुळे अनेक देश आणि संस्थांची संपत्ती अडकू शकते किंवा बुडू शकते. अनेक विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार रशियाकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा आहे, परंतु अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादलेले आहेत. त्यांच्यामुळे रशिया आता आपले पैसे वापरण्याच्या स्थितीत नाही. 24 फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनवर हल्ला सुरु केला आहे. तेव्हापासून पाश्चात्य देशांनी रशियावर विविध निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये रशियन मालमत्ता जप्त करणे आणि SWIFT या जागतिक पेमेंट सिस्टममधून रशियन बँकांची हकालपट्टी याचा समावेश आहे. ज्या देशांनी निर्बंध लादले आहेत त्यात अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियन सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.
आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना ज्योर्जिएवा यांनी यूएस टीव्ही चॅनेल ब्लूमबर्गला सांगितले की, निर्बंधांमुळे रशियाला IMF कडून स्पेशल ड्राइंग राइट्स (SDRs) वापरणे देखील कठीण झाले आहे.
दुसरीकडे रेटिंग एजन्सींनी रशियाचे कर्ज रेटिंग कमी केले आहे. हे पाहता आता रशिया डिफॉल्टर होणार हे निश्चित असल्याचे फिच रेटिंग्सने म्हटले आहे. रशिया या वर्षीच डिफॉल्ट होण्याची 71 टक्के शक्यता आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे. पाच वर्षांत रशिया डिफॉल्ट होण्याची शक्यता 81 टक्के एवढी आहे.
तज्ञांच्या मते, रशियासमोर असलेला एक मार्ग म्हणजे क्रेडिट डीफॉल्ट स्वॅप. कर्जफेड करणाऱ्या देशांनी 2008 च्या आर्थिक संकटाच्या वेळी या उपायाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला, परंतु सध्याच्या परिस्थितीत रशिया या उपायाद्वारे आपले कर्ज फेडण्यास सक्षम असेल की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा रशियाला रुबलमध्ये कर्जाची परतफेड करण्याची संधी मिळेल. पण सध्या रुबलचे मूल्य डॉलरच्या तुलनेत इतके घसरले आहे की, कर्ज देणारे देश आणि वित्तीय संस्था रुबलमध्ये कर्जाची परतफेड स्वीकारतील की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे, ज्या अंतर्गत रशियन सरकार आणि रशियन कंपन्यांना त्यांचे विदेशी कर्ज रुबलमध्ये भरण्यास सांगितले आहे.
सोन्याचा मोठा साठा, 630 अब्ज डॉलरचे परकीय चलनही
तज्ञांच्या मते, रशियाकडे सोन्याचा प्रचंड साठा आहे. त्यानंतर 630 अब्ज डॉलरचे परकीय चलनही आहे, परंतु यातील बहुतांश पैसा निर्बंधांमुळे परदेशात अडकला आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेने रशियाचे $१३२ अब्ज किमतीचे सोने जप्त केले आहे. त्याचवेळी, त्यांनी आपल्या बँकांमध्ये जमा केलेल्या रशियाच्या परकीय चलनाचा मोठा भाग देखील गोठवला आहे.
रशिया आयएमएफचा डिफॉल्टर नाही
सध्या दिलासा देणारी गोष्ट म्हणजे IMF ने रशियाला सदस्य म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिओग्रीवा म्हणाले की, रशियाने आतापर्यंत आयएमएफच्या कोणत्याही आर्थिक दायित्वांचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे कोणतेही कारण नाही. तज्ञांच्या मते, रशियाचे आयएमएफचे सदस्य राहिल्यामुळे त्यांना डिफॉल्टर होण्यापासून वाचण्याचा मार्ग शोधणे अद्याप शक्य आहे.