Latest

Nashik News : माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

गणेश सोनवणे

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा – माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे, यातून पाणी गळती होऊन अत्यंत कमी दाबाने नांदगावला पाणी मिळत असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात अडथळा होत होता. मागील वर्षी तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे शहराला मिळणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दहेगाव धरण कोरडे असून गिरणा धरणातून महिन्यातून एकदाच आवर्तन सोडले जात असल्यामुळे, माणिकपुंज धरणातून येणाऱ्या पाण्यावर भागवावे लागणार होते पण त्यातही नेहमीच पाणी लिक होण्याच्या समस्येमुळे शहराला प्रत्येक भागात पाणीपुरवठा करण्यासाठी 22-23 दिवस लागत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीचा अभ्यास करून आमदार सुहास कांदे यांनी नगर विकास विभागाकडे शहरातील पाणीटंचाईसाठी उपाययोजना म्हणून पाठपुरावा करून माणिकपुंज या तात्पुरत्या व तातडीच्या नळ योजनेच्या नव्या जलवाहिनीसाठी दोन कोटी रुपये अनुदान मंजूर करून घेतले आहे.

काही दिवस आधीच आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून गिरणा धरण ते नांदगाव शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश मिळाला आहे आणि या पाणी योजनेच्या स्वागता निमित्ताने नांदगाव शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून या योजनेचे स्वागत उत्साह साजरे केले. या योजनेचे कार्य तातडीने सुरू करण्यात आले असून वेहेळगाव ते साकोरा पर्यंत पाईपलाईन टाकली गेली आहे तसेच जलशुद्धीकरण केंद्र नांदगाव येथील जुनी पाण्याच्या टाकी मागील डोंगरावर काम सुरू झाले आहे.

नवीन पाणी योजनेचा आनंद नागरिकांमध्ये आहेच पण सध्या स्थितीत पाण्याचा टंचाईला सामोरे जावे लागत असताना आमदार सुहास कांदे यांनी तातडीने माणिकपुंज धरणावरून होणाऱ्या पाणीपुरवठा साठी नवीन जलवाहिनी करिता दोन कोटी रुपये मंजूर करून दिल्याबद्दल नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT