Latest

SRH vs RCB : आरसीबीचा हैदराबादवर ‘विराट’ विजय

Shambhuraj Pachindre

हैदराबाद; वृत्तसंस्था : विराट.. अतिविराट खेळीसाठी चाहत्यांचे डोळे तरसले होते, ती खेळी अखेर साकार झाली. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने दमदार, शानदार आणि धमाकेदार खेळी करताना शतकाला गवसणी घातली. हैदराबादच्या 187 धावांचा पाठलाग करताना विराटने 62 चेंडूंत शतक पूर्ण केले. आयपीएलमधील हे त्याचे सहावे शतक असून स्पर्धेतील सर्वाधिक शतकांच्या ख्रिस गेलशी त्याने बरोबरी केली. विराटने 2016 च्या आयपीएलमध्ये 4 शतके ठोकली होती.

डावाच्या पहिल्या चेंडूपासूनच विराट लयीत होता. त्याने भुवनेश्वरकुमाला चौकार मारून खाते उघडले. त्यानंतर त्याने धावांचा रतीब घालण्यास सुरुवात केली. शेवटी भुवनेश्वरच्या गोलंदाजीवरच षटकार मारून त्याने शतकाला गवसणी घातली; परंतु शतक पूर्ण होताच तो पुढच्या चेंडूवर बाद झाला. 63 चेंडू खेळणार्‍या विराटने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. या शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने हैदराबादचे 187 धावांचे आव्हान 19.2 षटकांत दोन विकेटस्च्या मोबदल्यात पार केले. आरसीबीकडून फाफ डू प्लेसिसने 71 धावांची खेळी केली. या दोघांनी 172 धावांची दमदार सलामी दिली.

सनराईजर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 187 धावांचे आव्हान पार करताना आरसीबीची सलामी जोडी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी तडाखेबाज सुरुवात केली. त्यांनी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत 6 षटकांत नाबाद 65 धावा ठोकल्या. विराट कोहलीने चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करत दमदार सुरुवात केली. त्यानंतर फाफ डू प्लेसिसने आपला गिअर बदलला.

फाफ डू प्लेसिसने विराटच्या मागून येत 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ विराट कोहलीने देखील 35 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर विराट – फाफ या जोडीने शतकी भागीदारी देखील पूर्ण केली. मात्र, आरसीबीला धावगती वाढवण्याची गरज होती. स्ट्राईक रेटवरून टीका होणार्‍या विराटने याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 12 व्या षटकानंतर तुफान फटकेबाजी करत बघता बघता आरसीबीला दीडशतकी मजल मारून दिली. हैदराबादला आरसीबीची सलामी जोडीच फोडण्यात यश येत नव्हते. सामना 15 चेंडूंत 20 धावा असा असताना षटकार मारत विराटने आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने आजच्या सामन्यात आयपीएलमधील आपले सहावे शतक ठोकले. मात्र, पुढच्याच चेंडूवर विराट कोहली 63 चेंडूंत शतक ठोकून बाद झाला. विराटच्या षटकारामुळे सामना 12 चेंडूंत 15 धावा असा आला होता.

दुसर्‍या बाजूने 45 चेंडूंत नाबाद 67 धावांवर खेळणार्‍या फाफ डू प्लेसिसने टी नटराजनला चौकार मारत सामना 10 चेंडूंत 10 धावा असा आणला. मात्र, तो पुढच्याच चेंडूवर 71 धावांवर बाद झाला. नटराजनने सामना 7 चेंडूंत 7 धावा असा आणला होता. मात्र, मॅक्सवेलने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तत्पूर्वी, यष्टिरक्षक हेन्रिच क्लासेनच्या क्लासिकल शतकी खेळीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले. क्लासेनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 203.92 च्या स्ट्राईक रेटने 51 चेंडूंत 104 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार लगावले. त्याला हॅरी ब्रुकने 15 चेंडूंत 27 धावा करत चांगली साथ दिली.

प्ले-ऑफकडे दमदार पाऊल

गुणतालिकेचा विचार केला तर आरसीबीने सामना जिंकून आपली गुणसंख्या 14 केली आहे. त्यांनी गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले असून मुंबई इंडियन्सला पाचव्या स्थानावर ढकलले. आरसीबीला आपले प्ले-ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे किंवा मग इतरांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. त्यांच्यासाठी समाधानाची बाब म्हणजे त्यांचा रनरेट +0.180 असा आहे.

हेही वाचा;

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT