Latest

Rohit Sharma-Shubman Gill : रोहित-शुबमन जोडी ठरतेय प्रतिस्पर्धी संघासाठी ‘किलर’!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma-Shubman Gill : टीम इंडियाचे नवीन वर्षातील वन-डे क्रिकेटचे विजयी अभियान जोमात सुरू झाले आहे. नुकताच श्रीलंकेला 50-50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 3-0 ने क्लिन स्विप दिला. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धचा पहिला वन-डे सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. सलग चार वन-डे जिंकणा-या टीम इंडियाच्या विजयी मोहिमेत रोहित शर्मा आणि शुबमन गिल या नव्या सलामी जोडीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

गिलच्या 'सलामी'साठी पुढाकार

कोणत्याही संघाला आपल्या फलंदाजीची दमदार सुरुवात व्हावी असेच वाटत असते. त्यामुळे यात सलामी जोडीचा रोल महत्त्वाचा ठरतो. भारतीय संघ व्यवस्थापनाने अगामी वन-डे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भरवशाची समाली जोडी तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. यात कर्णधार रोहित शर्माने पुढाकार घेत श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिलवर विश्वास दाखवला. माझ्यासोबत इशानऐवजी गिल डावाची सुरुवात करेल, असे त्याने स्पष्ट केले. त्यानंतर 23 वर्षीय युवा फलंदाजानेही कर्णधाराच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. गेल्या 4 पैकी 3 वनडेमध्ये गिलने रोहितच्या साथीने 1 शतकी आणि 2 अर्धशतकी सलामी देण्यात मोलाची भूमिका बजावली. (Rohit Sharma-Shubman Gill)

रोहित आणि गिल ओपनिंगमध्ये 'किलर'

2019 ते आत्तापर्यंत भारतीय संघाने वन-डे सामन्यांमध्ये 5 सलामीच्या जोडीचा प्रयोग केला. ज्यामध्ये सध्याची रोहित-गिल ही जोडी सर्वात मजबूत दिसत आहेत. या जोडीने पहिल्या 4 सामन्यातच धवन आणि राहुलच्या सलामीच्या भागीदारीचा विक्रम मोडला आहे. धवन आणि राहुल यांनी 5 वनडे सामन्यात 39 च्या सरासरीने 195 धावांची भागीदारी केली होती. दुसरीकडे, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 4 सामन्यात 82.75 च्या सरासरीने 331 धावांचे योगदान दिले आहे.

टीम इंडियासाठी 2019 नंतर ते आतापर्यंत वन-डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामी जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची आहे. या दोघांनी मिळून 27 सामन्यांत 44.46 च्या सरासरीने 1156 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी आहे, ज्यांनी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 90.18 च्या सरासरीने 992 धावा जोडल्या आहेत. त्याचबरोबर तिसरी सर्वात यशस्वी सलामी जोडी शिखर धवन आणि शुभमन गिलची आहे. या दोघांमध्ये 11 सामन्यात 76.20 च्या सरासरीने 762 धावांची भागीदारी झाली आहे. (Rohit Sharma-Shubman Gill)

4 सामने फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी

रोहित आणि शुभमन यांनी आतापर्यंत 4 सामन्यात 1 शतकी भागीदारी आणि 2 अर्धशतकांच्या भागीदारीसह 331 धावा केल्या आहेत. या दोघांनी ज्या पद्धतीने 4 सामन्यांमध्ये सुरुवातीचा ट्रेलर दाखवला आहे, त्यावरून खरा पिक्चर अजून समोर यायचा आहे, असे दिसते. ही हिट जोडी भविष्यात आपली छाप सोडण्यासाठी सज्ज तर झाली आहेच पण आगामी काळात ते नवेनवे विक्रम रचतील यात शंका नाही.

SCROLL FOR NEXT