पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्याशी युती केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणच पालटून गेले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सूचक ट्विट करत सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्रच पालटले. या बंडानंतर शिंदे-फडणवीस अशी युती होत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. वर्षभराच्या काळानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार त्यांच्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की," गोलगोल वेटोळ्यांसारखा रस्ता म्हणजे आजची राजकीय स्थिती….नागमोडी रस्ता म्हणजे U टर्न घेतल्याप्रमाणे वारंवार भूमिका बदलणारे नेते… आणि वरील दोन्ही गोष्टींमुळं स्तब्ध झालेली जनता म्हणजे ट्रॅफिक जॅमचा फोटो, हा आहे आजचा महाराष्ट्र!
रोहित पवार यांनी आणखी एक फोटो शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हा फोटो ट्रकचा आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, "लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना. खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर. आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते. जसं राजकारणासाठी भाजपने चुकीचा मार्ग निवडलाय. आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल.
रोहित पवार यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
हेही वाचा