Latest

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांना हटवा: ‘आप’ची केंद्रीय गृहमंत्र्यांसह केंद्रीय सर्तकता आयोगाकडे तक्रार

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सरकारी सेवेत असताना देखील राजकीय पदांवर नियुक्ती प्रकरणी आम आदमी पार्टीने भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांना लक्ष करीत 'आप'ने सवाल उपस्थित केले आहेत. लालपुरा भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य आहेत. यासोबतच ते भाजपच्या निवडणूक समितीचे देखील सदस्य आहेत. असे असताना त्यांची घटनात्मक पदावरील नियुक्ती म्हणजे थेट नियमांचे उल्लंघन असून त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी 'आप'ने केली आहे.

यासंबंधी 'आप' नेते सौरभ भारद्वाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय सर्तकता आयोगाकडे तक्रार केली आहे. इकबाल सिंह लालपुरा अशा आयोगाचे अध्यक्ष आहेत. ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या तक्रारी येतात. अशा संस्थांचा अध्यक्ष पूर्णत: निष्पक्ष असावा. त्यांचा राजकारण तसेच राजकीय पक्षांसोबत कुठलाही संबंध नसावा. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते. यानंतर देखील त्यांनी राजकारण सोडले नाही.

पंजाब निवडणुकीच्या वेळी डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होतो. आणि भाजपच्या तिकिटवर ते पंजाब विधानसभेची निवडणूक लढले होते. निवडणुकीतील पराभवानंतर एप्रिल २०२२ मध्ये ते पुन्हा अध्यक्ष बनले. अशाप्रकारे घटनात्मक पदांचा उपहास केला जात आहे. ते भाजपचे प्रवक्ते म्हणून कार्य करीत असल्याचा आरोप देखील भारद्वाज यांनी केला आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT