Latest

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

येत्या काही महिन्यांत राज्य सार्वजनिक आरोग्य विभागात १० हजार १२७ पदांसाठी मेगा भरती करणार आहे. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ना. गिरीश महाजन यांनी मुंबई येथे दिली.

मार्च २०१८ मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघाली होती. त्यावेळी साडेअकरा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु, कोरोना काळामुळे, आरक्षणाच्या अडचणींमुळे तसेच महापोर्टलच्या रद्द होण्याने दरम्यानच्या काळातील भरती होऊ शकली नाही. परंतु, नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आरोग्य विभागात १० हजार १२७ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे ना. महाजन म्हटले.

जानेवारीत येणार जाहिरात

फेब्रुवारी – मार्च दरम्यान या परीक्षा होणार आहेत. दि. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत सर्व जागा भरून नियुक्तिपत्रे दिली जाणार असल्याचे ना. महाजन यांनी स्पष्ट केले. त्यासाठी १ ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर महिनाभरात तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील, तर २५ ते ३० जानेवारी या काळात अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याने दि. २५ ते २६ मार्च या काळात परीक्षा होतील.

कोरोनात सेवा बजावलेल्यांना प्राधान्य

कोरोना काळात राज्यामध्ये मागील दोन ते अडीच वर्षांत कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे ना. गिरीश महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT