Latest

Rajat Patidar : विराट कोहलीच्या RCB ला झटका! ‘हा’ स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा 16 हंगाम सुरू होऊन एक आठवडाही झाला नाही आणि तोच एकामागून एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडत आहेत. यात आता विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलाही मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू रजत पाटीदार (rajat patidar) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आरसीबीने याची माहिती दिली आहे. पण फ्रँचायझीने रजतच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात घेतले जाईल याची अद्याप घोषणा केलेली नाही.

आरसीबीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की, 'दुर्दैवाने, टाचेच्या दुखापतीमुळे रजत पाटीदार आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. तो लवकर बरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. संघाचे सर्व खेळाडू आणि व्यवस्थापन त्याच्या पाठीशी आहे. रजतच्या बदली खेळाडूबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.'

आरसीबीने यंदाच्या हंगामात मोठ्या विजयाने सुरुवात केली. त्यांनी पहिल्याच सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आरसीबीचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 6 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर होणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच संघाला रजत पाटीदारच्या (rajat patidar) रुपाने मोठा धक्का बसला आहे. तो पहिल्या सामन्यातही खेळला नव्हता.

पाटीदार हा ब-याच काळापासून टाचेच्या दुखापतीशी झुंजत आहेत. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये फिटनेसवर काम करत आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात रजत पाटीदारने आठ सामन्यांच्या सात डावात 152.75 च्या स्ट्राइक रेटने 333 धावा चोपल्या होत्या. त्याने एक शतकही झळकावले होते. यादरम्यान त्याची सरासरी 55.50 होती.

रजत पाटीदारची चमकदार कारकीर्द

रजत पाटीदारने आतापर्यंत आयपीएलमध्ये 12 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 40.4 च्या सरासरीने आणि 144.29 च्या स्ट्राईक रेटने 404 धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत. रजतच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 52 सामन्यांत 45.72 च्या सरासरीने 3795 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 11 शतके आणि 22 अर्धशतके झळकावली. रजतच्या नावावर 51 लिस्ट ए सामन्यात 1648 धावा आहेत. त्याने तीन शतके आणि आठ अर्धशतके फटकावली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT