Latest

RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो रेट (RBI Monetary Policy) वाढवला आहे. यावेळी रेपो दर ५० बेस पॉईंट म्हणजे ०.५० टक्क्याने वाढवला आहे. यामुळे रेपो रेट ५.४० टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे कर्जे महागणार आहे. याआधी फेब्रुवारीत आरबीआयने रेपो रेट ०.४० टक्क्याने वाढवला होता. त्यानंतर ८ जून रोजी झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ४.९० टक्के केला होता. २०२२-२३ मध्ये महागाई दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे; तर २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत किरकोळ महागाई (सीपीआय) दर ५ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवल्यामुळे कोरोना संसर्गाच्या आधीच्या स्तरावर पोहोचला आहे.

२०२२-२३ मध्ये GDP वृद्धीचा अंदाज ७.२ टक्के एवढा कायम ठेवण्यात आला आहे. GDP वृद्धी पहिल्या तिमाहीत १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे दास यांनी म्हटले आहे.

रुपयातील अस्थिरता मर्यादित करण्यासाठी परकीय चलनाचा साठा कमी होऊनही भारताचा चलनसाठा जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर असल्याचे आऱबीआय गर्व्हनर दास यांनी म्हटले आहे. आरबीआय रुपयाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. बँकेच्या पत वाढीचा (credit growth) वेग १४ टक्के आहे जो मागील वर्षी ५.५ टक्के होता. मुदत ठेवींच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक क्षेत्रासाठी तरलता वाढली पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेला भौगोलिक-राजकीय जोखमींसारख्या जागतिक घटकांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले आहे. (RBI Monetary Policy)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT