Latest

Ravindra Mahajani : खेळ कुणाला दैवाचा कळला?, रवींद्र महाजनी यांच्याबाबतीत नेमकं काय घडलं?

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाने ८० दशकाचा काळ गाजवला, असे प्रतिभावंत, देखणं व्यक्तिमत्व, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. रवींद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहत होते. त्यांचा मृतदेह बंद घरात आढळून आला. एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्याची अशी एक्झिट होणे हे दुःखदायक आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Ravindra Mahajani)

मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे प्रतिभावंत अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचा मृत्यू निधन दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१४) पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे रवींद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घराचे दार तोडून घरात प्रवेश केला. तपासात आढळून आले की, रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. रवींद्र हे गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून एकटेच राहत होते. त्यांचा मृतदेह त्यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता गश्मिर महाजनी याच्याकडे शवविच्छेदानंतर ताब्यात देण्यात येणार आहे. रवींद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

Ravindra Mahajani : खेळ कुणाला दैवाचा कळला ?

रविंद्र महाजनी यांचा देवता चित्रपट गाजला. त्यात आशा काळे देखील प्रमुख भूमिकेत होत्या. या चित्रपटातील 'खेळ कुणाला दैवाचा कळला?' हे गाणं खुप गाजलं. 'देवता' चित्रपटातील हे गाणे अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर यांनी गायलं होतं. हे गाण रवींद्र महाजनी आणि आशा काळे यांच्यावर चित्रित झाले आहे. या गाण्याने चाहत्यांच्या मनावर गारुड केलं. आजही ते गाण लोकांच्या मनात रुंजी घालते. या गाण्याचे बोल पुढीलप्रमाणे,

Ravindra Mahajani

मी असो, तू असो, हा असो, कुणी असो

दैवलेख ना कधी कुणा टळला!

जवळ असुनही कसा दुरावा?

भाव मनीचा कुणा कळावा?

खेळ कुणाला दैवाचा कळला?

हार कुणाची? जीत कुणाची?

झुंज चालली दोन मनांची

खेळ कुणाला दैवाचा कळला?

'या' चित्रपटातून अभिनयात प्रवेश 

रवींद्र महाजनी यांनी १९७५ मध्ये व्ही. शांताराम यांच्या झुंज या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आराम-हराम, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मीची पावले, देऊळ बंद, बेलभंडारा, दुनिया करी सलाम, पानिपत अनेक चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. मराठीसह त्यांनी हिंदी चित्रपटातही अभिनय केला आहे. मुंबईचा फौजदार या चित्रपटाने त्यांना एक ओळख दिली. पानीपत हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी आपला मुलगा गश्मिर महाजनीसोबत अभिनय केला. आपल्या अभिनयाने आपला एक चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या रवींद्र यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT