Latest

रतन टाटांची ‘स्‍वप्‍नपूर्ती’, मुंबईत साकारले पाळीव प्राण्‍यांसाठी जागतिक दर्जाचे हॉस्‍पिटल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "आज कुटुंबातील सदस्यापेक्षा पाळीव प्राणी वेगळे नाहीत. मी आयुष्यभर अनेक पाळीव प्राण्यांचे पालकत्‍व स्‍वीकारले. मी पाळीव प्राण्‍यांसाठीच्‍या हॉस्पिटलची गरज ओळखतो," अशा शब्‍दांमध्‍ये देशातील प्रख्‍यात उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्‍या स्‍वप्‍नपूर्तीवर भाष्‍य केले. देशात जागतिक दर्जाचे पशुवैद्यकीय रुग्‍णालय सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न लवकरच मुंबईतील  महालक्ष्मी परिसरात टाटा ट्रस्ट्सच्‍या 'स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल'च्या उद्घाटनाने साकार होणार आहे. (Ratan Tata finally completes a veterinary hospital in Mumbai )

देशातील सर्वात मोठे पशुवैद्यकीय रुग्‍णालय

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार , मुंबईत विविध अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत टाटा ट्रस्टने २२ एकर परिसरात १६५ कोटी रुपये खर्चून पाळीव प्राण्‍यांसाठी २४ तास सेवा देणारे हॉस्‍पिटल साकारले आहे. हे हॉस्‍टिपल देशातील सर्वात मोठ्या पशुवैद्यकीय रुग्‍णालयापैकी एक ठरणार असून, पुढील महिन्‍यापासून येथील सेवा सुरु होणार आहे. (Ratan Tata finally completes a veterinary hospital in Mumbai )

अशी सूचली कल्‍पना…

पशुवैद्यकीय रुग्‍णालयाची कल्‍पना कशी सूचली याबाबत बोलताना रतन टाटा यांनी म्‍हटलं की, ते एकदा अमेरिका दौर्‍यावर आपल्‍या पाळीव कुत्र्याला घेवून जाणार होते. विमान प्रवासापूर्वी कुत्र्याच्‍या सांध्‍याला दुखापत झाली. त्‍यावेळी त्‍याला वेळेत उपचार मिळाले असते तर तो पूर्ण बरा झाला असता; पण उपचाराला विलंब झाला. कुत्र्याचा सांधा एका विशिष्ट स्थितीत गोठवला गेला. तेव्‍हाच मुंबईत जागतिक दर्जाचे पशुवैद्यकीय रुग्णालय असावे, अशी कल्‍पना रतन टाटा यांना सूचली आणि त्‍यांनी याचा पाठपुरावा सुरु केला.

सातत्‍याने पाठपुरावा…

मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी रतन टाटा यांनी पाठपुरावा सुरु केला. २०१७ मध्‍ये नवी मुंबईतील कळंबोली येथील जमिनीचा करारही झाला होता. मात्र मुंबईतील पाळीव प्राणी पालकांना मोठा प्रवास करावा लागेल. तसेच पाळीव प्राण्‍यांना आपत्कालीन सेवेवेळी हा प्रवास हा मोठा अडथळा ठरेल, असा विचार समोर आला. यानंतर जमिनीसाठी योग्य जागा शोधणे. सर्व सरकारी परवानग्या मिळवणे यासाठी वेळ गेला. परळ येथील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर ॲनिमल्स (बीएसडीपीएचए) पासून दूर जमिनीसाठी टाटा ट्रस्टचा मुंबई महापालिकेसोबत ३० वर्षांचा भाडेपट्टा करार झाला. यानंतर कोरोनाची साथ आली. हॉस्‍पिटलचे बांधकाम थांबवावे लागले. अखेर महापालिकेसोबरचा करार आणि सर्व कायदेशीर बाबींच्‍या पूर्ततेसाठी सुमारे दीड वर्ष लागली. कोरोना लाट ओसरल्‍यानंतर परिस्‍थिती सर्वसामान्‍य झाली. मात्र तोपर्यंत पोलाद, मनुष्यबळ आणि कच्च्या मालाची उपलब्धता यांच्या महागाईमुळे रुग्णालयाच्या खर्चावरही परिणाम झाला, असेही रतन टाटा यांनी स्‍पष्‍ट केले.

एकाचवेळी 200 प्राण्‍यांवर उपचाराची साेय

ब्रिटनमधील पशुवैद्यक (प्राण्‍यांचे डॉक्‍टर ) थॉमस हेथको यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली पाच मजली हॉस्‍पिटलमध्‍ये एकाचवेळी २०० प्राण्‍यांवर उपचाराची सोय आहे. लंडनमधील रॉयल व्‍हेटर्नरी कॉलेजसह पाच पशुवैद्यकीय महाविद्‍यालयांशी प्रशिक्षणाचा करारही झाला आहे. हे रुग्‍णालय पाळीव प्राण्‍यांचे आजारांचे निदान, शस्त्रक्रिया आणि औषध सेवा देणार आहे.

स्‍वप्‍नपूर्तीचा आनंद…

मुंबई शहरात एक अत्याधुनिक प्राणी आरोग्य केंद्र असावे, हे माझे स्वप्न होते. अखेर ते साकारले आहे. माझ्‍यासाठी ही खूपच आनंददायी बाब आहे. हे हॉस्‍पिटल पाळीव प्राणी असलेल्या किंवा संकटात सापडलेल्या प्राण्यांसाठी साधन असेल. ते प्राण्‍यांसाठी वरदान ठरेल, असा विश्‍वासही रतन टाटांनी व्‍यक्‍त केला. विशेष म्‍हणजे, भटक्या कुत्र्यांसाठी मुंबईतील टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये एक खास निवारा केंद्र आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT