Latest

पुणे : आदीवासी चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत फाशी

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

पानशेत धरणाजवळील कुरण खुर्द (ता. वेल्हे) येथील आदिवासी कातकरी समाजाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या संजय बबन काटकर (वय ३८, रा. कादवे, ता. वेल्हे) या नराधमास न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या या घटनेने पानशेत-सिंहगड भागासह परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अत्याचारीत चिमुरडीला जलदगती न्यायालयाच्या निकालाने वर्षभरात न्याय मिळाला आहे.

अपहरण करून केला खून

आरोपीने अंगणात खेळणाऱ्या चिमुरडीचे प्रथम आपहरण केले. नंतर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. आरोपी संजय काटकर यास जलदगती जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. २८ फेब्रुवारी) मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी न्यायालयाच्या निकालाची मंगळवारी (दि. १) माहिती दिली. गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी कुरण खुर्द येथील कातकरी वस्तीतील चार वर्षीय मुलगी हरवली असल्याची फिर्याद वेल्हे पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दाखल केली होती.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणी माहिती घेतली असता त्यांना चिरमुरडीचे अपहरण झाले असावे असा संशय आला. त्यानंतर तातडीने पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळीची पाहणी केली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख, तत्कालीन पोलीस अधिकारी विवेक पाटील, डॉ. सई भोरे पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी घटनेची गंभीरता पाहून पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या आठ पथके तसेच वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सखोल तपास सुरू केला.

पानशेत पासून सिंहगड किल्ल्याचा परिसर, वेल्हे आदी ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे, खेड्यापाड्यात जाऊन मुलीचा शोध घेतला. सिंहगडाच्या पश्चिमेला मालखेडजवळील दुर्गम थोपटेवाडी रस्त्याच्या पुलाच्या मोरीच्या नळीत दि. १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चिमुरडीचा मुतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३०२, २०१ गुन्हा दाखल करण्यात आला. चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे भा.द.वी. कलम ३७६, ३७६ (अ), ३७६ आय.जे. व लैंगीक अत्याचार बाल संहिता अधिनियम ४,६,८ तसेच भा.द.वी कलम ए. बी. पाक्सो कायदा कलम ३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

४८ तासात केले होते जेरबंद

वेल्हे पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, रिक्षाचालक , दुकानदार व इतरांकडून माहिती घेतली असता संजय बबन काटकर हा आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र आरोपी काटकर अतिदुर्गम भागात लपला होता. तेथे मोबाईल फोनला रेंजही नसल्याने कडेकपाऱ्यातुन पायपीट करत पोलीस पथकाने त्याला ४८ तासाच्या आत जेरबंद केले होते. पोलिसांनी आरोपी विरूध्द परीस्थितीजन्य पुरावा, सी. ए. रिपोर्ट, डी.एन.ए. टेस्टींग, मेडीकल ग्राऊंड व इतर पुरावे गोळा करून न्यायालयात त्याच्याविरूध्द दोषारोपपत्र मुदतीत सादर केले. पोलीसांच्या विनंतीवरून गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी दाखल करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय ए. देशमुख यांनी आरोपी काटकर याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, सहाय्यक फौजदार एस. एस. बादंल ,आर. एस. गायकवाड, औदुंबर आडवाल, पोलीस जवान ए. पी. शिंदे, अजय साळुंखे, सुर्यकांत ओमासे, व्हि. एस. मोरे, डी. ए. जाधव यांच्या पथकाने परिश्रम घेतले.
विशेष सरकारी अभियोक्ता विलास पठारे यांनी सरकारतर्फे कामकाज पाहीले. पोलीस नाईक प्रसाद मांडके, सहाय्यक फौजदार विद्याधर निचित यांनी साह्य केले.

SCROLL FOR NEXT