Latest

विधान परिषद निवडणूक : भाजप-‘मविआ’ची 1-1 मते बाद

अविनाश सुतार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्षानंतर विधान परिषदेची निवडणूक पार पडली. २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर संध्याकाळी मतमोजणीला सुरुवात होणार होती पण काँग्रेसने भाजपच्या मतांवर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला उशीर झाला.

मतमोजणी ८ नंतर सुरू झाली. मात्र पहिल्या फेरीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद झाल्याचे समोर आले अन् खळबळ उडाली. महाविकास आघाडीसाठी हा धक्का असल्याची चर्चा रंगली. जे मत बाद झाल्याचे समोर आले त्यावर भाजपच्या वतीनं आक्षेप घेण्यात आला होता.

यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये खडाजंगीस सुरुवात झाली. पण त्यानंतर हे मत बाजूला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मतपत्रिकेची झेरॉक्स कॉपी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर निर्णय येईल. दरम्यान, या घडामोडीनंतर शेवटच्या २५ मतपत्रिकांची छाननी सुरू ठेवली.

भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे.

दोन्ही बाजूने आक्षेप घेतेली दोन मते बाद ठरवण्यात आली आहेत. त्यामुळे आता २८३ मतांची मोजणी होणार आहे.

गदारोळ झाल्यानंतर मतमोजणीला पुन्हा सुरुवात झाली आहे.

काँग्रेसचा भाजपच्या दोन आमदारांवर आक्षेप

दरम्यान, काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांवर आक्षेप घेतला. काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. भाजपने या आक्षेपावर केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी उत्तर पाठवले आहे. दरम्यान, आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला. त्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली. विधान भवन परिसरात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपचे कार्यकर्ते जमू लागले आहेत. कार्यर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे. आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या आजारी असलेल्या आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या प्रतिनिधीमार्फत मतदान केले आणि त्या मतपत्रिका प्रतिनिधींनी मतपेटीत टाकल्या. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचा भंग झाला असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, तीन दिवसापूर्वीच या आमदारांनी लेखी परवानगी घेतली होती, त्यामुळे हा निवडणूक प्रक्रियेचा भंग होत नाही, असे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसची तक्रार फेटाळली.

भाजपचे पिंपरी- चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या मुक्ता टिळक हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आमदारांना भाजपने मतदानासाठी रुग्णवाहिकेतून आज मतदानासाठी विधानभवनात आणण्यात आले. त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत मतदान केले. पण या दोन्ही आमदारांच्या मतदानाला काँग्रेसने लेखी तक्रार करून आक्षेप घेतला.

आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत मतपत्रिका घेतली. आणि या आमदारांनी मतदान केल्यानंतर त्या मतपत्रिका प्रतिनिधींनी मतपेटीत टाकल्या. पण याला काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेचा भंग झाल्याचे म्हटले आहे. ३७ 'अ' या निवडणूक नियमानुसार आंधळा, अशिक्षित किंवा वृद्धापकाळाने मतदान करण्यास असमर्थ असेल. तर १८ वर्षांवरील प्रतिनिधीची मदत घेता येते. पण येथे या आमदारांनी स्वाक्षरी केल्या. त्यामुळे त्यांनी स्वतः हे मतदान मतपेटीत टाकायला हवे होते, असा आक्षेप काँग्रेसने घेतला. पण त्यांनी रीतसर परवानगी घेतली होती, असे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT