पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेत चांद्रयान-3 मोहिमेवरील चर्चेदरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी गुरुवारी (दि.२१) बहुजन समाज पार्टीचे (बसपा) खासदार दानिश अली यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली हाेती. चर्चेदरम्यान व्यत्यय आणल्यावर बिधुरी यांनी दानिश अली यांचा दहशतवादी, असा उल्लेख केला हाेता. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी शुक्रवारी दानिश अली यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. भेटीनंतर दानिश अली यांनी माध्यमांशी बाेलताना भावनिक होत म्हणाले की, "मला वाटले की मी एकटा नाही." (Ramesh Bidhuri)
संबधित बातम्या
कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी शुक्रवारी (दि.२२) खासदार दानिश अली त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि खासदार इम्रान प्रतापगढ़ी हेही राहुल गांधींसोबत होते. दानिश अली यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या आपल्या 'X' खात्यावर भेटीची फोटो शेअर करत म्हटलं आहे की,"द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान….." (नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान)
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (दि.२१) लोकसभेत भाजप खासदार रमेश बिधुरी चंद्रयान-3 च्या यशावर बोलत होते. त्याचवेळी खासदार दानिश अली यांनी विधान केले. यावर बिधुरी यांनी '…ये आतंकवादी है' अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. त्यांच्या या आक्षेपार्ह शब्दांवर विरोधकांनी कडाडून आक्षेप घेतला. दानिश अली हे उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघाचे खासदार आहेत.
भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्या वादग्रस्त विधानावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी या शब्दांमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अस म्हटलं. सिंह यांनी दिलगिरी व्यक्त करताच विरोधकांचा राग काहीसा शांत झाला. त्यांनी लाेकसभेत बाके वाजवून दिलगिरीचा स्वीकार केला.
राहुल गांधी यांनी निवासस्थानी भेट घेतल्यानंतर भावनिक झालेल्या दानिश अली यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले की, मला वाटले की मी आज "एकटा नाही" आहे. राहुल गांधी माझे मनोबल वाढवण्यासाठी येथे आले होते. त्यांनी मला सांगितले की, "मनावर घेऊ नका आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या."
माझ्यावर लाेकसभेत करण्यात आलेली टिपण्णी म्हणजे लोकशाही आणि संविधानावरील हल्ला आहे. अमृतकाळच्या काळात नव्या संसदेत आता रस्त्यावर द्वेषाची दुकाने थाटली जात आहेत, हे खेदजनक आहे. लोकसभा आमची संरक्षक आहे," असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्यासाेबतच्या भेटीचा फाेटाे शेअर करत काँग्रेसने आपल्या ' X' खात्यावर लिहिले की, "रमेश बिधुरी यांची ही लज्जास्पद कृती लाेकसभेच्या प्रतिष्ठेला डाग आहे. लोकशाहीच्या मंदिरात द्वेष आणि द्वेषाच्या अशा मानसिकते विरोधात कॉंग्रेस पक्ष ठामपणे आहे."
हेही वाचा