पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. असे असतानाही मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड करावी, हा पेच पक्षश्रेष्ठींसमोर कायम आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. याचा निर्णय एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे. दरम्यान, राजस्थान भाजपमधील बैठका वाढल्या आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांनी मागील दोन दिवसांमध्ये ७० आमदारांशी चर्चा केली आहे. या सर्व आमदारांनी वसुंधरा यांना पाठिंबा दिला असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. दरम्यान, राजस्थान मुख्यमंत्रीपदासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, दिया कुमारी आणि बाबा बालकनाथ यांचीही नावे चर्चेत असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. (Rajasthan Politics )
वसुंधरा यांचे समर्थक आणि आठ वेळा आमदार राहिलेले कालीचरण सराफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, वसुंधरा राजे यांनी मागील दोन दिवसांमध्ये ७० आमदारांची भेट घेतली आहे. त्यांनी प्रचार केलेल्या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, वसुंधरा यांची भेट घेतल्यानंतर आमदार बहादूर कोळी, गोपीचंद मीना आणि समराम गरासिया यांनी सांगितले की, आमची पहिली पसंती वसुंधरा यांना असेल. त्या आमच्या सर्वमान्य नेत्या आहेत. राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार हे पक्ष ठरवेल. पक्षात वैयक्तिक पसंती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजस्थान विधानसभा निवडणूक निकालाच्या तीन दिवस आधीपासून वसुंधरा राजे या सक्रिय झाल्या आहेत. विजयाची शक्यता असलेल्या अपक्ष आमदारांशीही त्यांनी संपर्क साधला होता. त्या स्वतः आमदारांना फोन करून अभिनंदन करत होत्या. राजस्थानमधील २०० जागांपैकी १९९ जागांच्या निकालात भाजपला ११५ जागा मिळाल्या आहेत. त्याचबरोबर काँग्रेसने ६९ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित जागा लहान पक्ष आणि अपक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत. निवडणुकीचे निकाल हाती आल्यापासून राज्यातील राजकीय पेच वाढला आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्थतीमध्ये ओम बिर्ला, बाबा बालक नाथ आणि दिया कुमारी यांची नावेही आहेत. . पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जेव्हा पक्षाला कोणत्याही चेहऱ्याशिवाय निवडणुकीत बहुमत मिळू शकते, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता वसुंधरा यांच्या ऐवजी अन्य र नावांचीही गांभीर्याने दखल घेतली जात आहे, असे राज्यातील राजकीय विश्लेषक म्हणतात.
हेही वाचा :