Latest

Raj Thackeray: भूमिका बदलणं आवश्यक: मोदींना पाठिंबा देण्याबाबत राज ठाकरेंचा मोठा खुलासा

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याबाबत त्यांनी आज (दि.१३) पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर त्यांनी महायुती आणि पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा का दिला? याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा केला.  मला भूमिका बदलणे आवश्यक होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा संधी द्यावी, असे वाटले, म्हणून त्यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. Raj Thackeray

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा संधी द्यावी वाटली. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविणे, राम मंदिर बांधल्यानंतर मीच पहिल्यांदा मोदी यांचे कौतुक केले होते. चांगल्या कामासाठी माझा नेहमी पाठिंबा राहिला आहे. महायुतील पाठिंबाबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा केली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार नियोजनासाठी बैठकीत चर्चा झाली. राज्यभरातील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार की नाही, याबाबत अजून ठरलेले नाही, असे ते म्हणाले. Raj Thackeray

लोकसभा निवडणुकीत मनसैनिकांना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. महायुतीतील घटक पक्षांतील नेत्यांनी कोणत्या  मनसे कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, याची यादी दोन दिवसांत तयार करण्यात येईल, त्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून प्रचाराचे नियोजन करावे.

मला मुख्यमंत्री पद हवं होते आणि पक्ष फोडला म्हणून मी मोदीवर टीका करू का? असा टोला राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.  मला भूमिका बदलणे आवश्यक होते. त्यामुळे मोदी आणि महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी नसते तर राम मंदिर उभे राहिले नसते, असेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे आवश्यक आहे. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. उद्योगधंदे, औद्योगिकरण, आदींचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातबरोबर इतर राज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून अजूनही काही अपेक्षा आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT