पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अवकाळीने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यासह देशातील बहुतांश भागात गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी देखील चिंतेत आहे. ही स्थिती देशातील बहुतांश भागात बुधवारी 3 मे पर्यंत कायम राहणार असून, तो पर्यंत गडगडाटी वादळासह पाऊस सुरूच राहणार आहे. त्यानंतर ४ मे पासून देशभरात अवकाळीपासून दिलासा मिळणार आहे, अशी माहिती (Rainfall update) भारतीय हवामान विभागाने ट्विटरवरून दिली आहे.
पुढचे काही दिवस म्हणजे 5 मेपर्यंत देशभरातील काही भागात पाऊस कायम (Rainfall update) असणार आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला शुक्रवार ५ मे पर्यंत यलो अलर्ट कायम देण्यात आला असून, या विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसांची शक्यता आहे. आज (दि. १ मे) आणि उद्या (दि.२ मे) संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह अधिक पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू राज्यासह देशभरातील पाऊस कमी होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.