पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या सात दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस पडला नाही. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र पुढील ३,४ दिवस मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केले आहे.
कित्येक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे ढग दाटून आले आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भालाही यलो अलर्ट देण्यात आला असून, जोरदार पावसाची अधिक शक्यता आहे, असे हवामान विभागाने आज (दि.१६) दिलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे.
बुलेटीनमध्ये म्हटले आहे की, आजपासून (दि.१६) महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज आहे. रविवार २० ऑगस्टपर्यंत राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना १७, १८ आणि १९ ला, तर विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना उद्यापासून रविवारी २० ऑगस्टपर्यंत विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाची दाट शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.