Latest

Pune Rain Update : पुन्हा आला..! 24 तासांत लोणावळा, चिंचवडमध्ये अतिवृष्टी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चोवीस तासांत पुणे शहर व परिसरात हंगामातील सर्वांत मोठ्या पावसाची नोंद झाली. लोणावळा 105, तर चिंचवड भागात चोवीस तासांत 83.3 मि.मी. इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. त्या पाठोपाठ मगरपट्टा भागात 54 मि.मी.ची नोंद झाली. शुक्रवारी उत्तररात्री सुरू झालेला पाऊस शनिवारी दुपारी 1 नंतर थांबला. दरम्यान, शहरातील पावसाने 300 मि.मी.चा टप्पा पार केला असून, अजून सरासरीपेक्षा 200 मि.मी.ची तूट आहे. पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवल्याप्रमाणे शुक्रवारीच शहर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरात पावसाचा जोर उपनगरापेक्षा कमी होता. शहराच्या पूर्व व पश्चिम भागांत पावसाचा जोर जास्त होता.

या पावसामुळे गेले दोन दिवस तापलेले शहर थंड झाले. तापमानात 21 वरून 34 अंशांवर वाढ झाली होती. शनिवारी सकाळी तापमान 34 वरून पुन्हा 19 ते 21 अंशांवर गेले होते. यंदा शहरात जून पाठोपाठ ऑगस्ट महिना कोरडा गेला. थोडाफार पाऊस झाला तो जुलैमध्ये. मात्र, या पावसाला मोठा जोर नव्हता. दररोज 1 ते 5 मि.मी. पाऊस जुलैमध्ये पडला. सर्वाधिक पाऊस 22 जुलै रोजी 23 मि.मी. इतका पडला. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने शहरात 5 मि.मी.च्यावर पाऊस झालाच नाही. 2 सप्टेंबर रोजी शनिवारी मोठ्या खंडानंतर शहर व परिसरात मोठ्या पावसाची नोंद झाली.

उत्तर रात्रीपासून सुरू झाला पाऊस

शहरासह उपनगर भागात उत्तररात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. शहराच्या पूर्व भागात पावसाचा जोर जास्त होता. हडपसर, मगरपट्टा, नगर रस्ता या भागात पहाटेपासून जोर होता. तसेच शहरातील सर्व पेठांत पावसाने दाणादाण उडवून दिली. सकाळी शाळेत जाताना मुलांसह पालकांची तारांबळ उडाली. सकाळी साडेसातनंतर पावसाचा जोर वाढला तो सकाळी 11 वाजता कमी झाला. शिवाजीनगर, कर्वे रस्ता, कोथरूड ते चांदणी चौक, रेल्वे स्टेशन, स्वारगेट परिसर, पर्वती, कात्रज रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, खडकी परिसर, वारजे, फुरसुंगी, कोंढवा, महंमदवाडी या भागांतील शेतात पावसाचा जोर जास्त होता. त्या ठिकाणी शेतात पाणी साचले होते.

क्युमुनोलिंबस ढगांमुळे अतिवृष्टी

पुणे वेधशाळेतील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, शहरावर क्युम्युनोलिंबस ढगांची गर्दी झाली होती. खास करून पश्चिमेकडे चिंचवड भाग, तर पूर्वेकडे मगरपट्टा भागात जोरदार पाऊस झाला. चिंचवड 24 तासांत 83 मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हा मोठा पाऊस ठरला.

तापमानात 6 अंशांनी घट

गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसाने शहरातील कमालीचा उकाडा अचानक कमी झाला. दोन दिवसांपूर्वी शहराचे तापमान 32 ते 34 अंशांवर गेले होते. त्यात घट होऊन ते शनिवारी 26 अंशांवर आले होते. सायंकाळी गारठा जाणवू लागला. तसेच आर्द्रता 80 टक्क्यांवरून 97 ते 100 टक्क्यांवर गेली.

24 तासांत झालेला पाऊस (मि.मी.)
(शुक्रवार-शनिवार
सकाळी 9 पर्यंत)
लोणावळा : 105
चिंचवड ः 83.5
मगरपट्टा : 54
लोहगाव : 31.8
शिवाजीनगर : 19.6
पाषाण : 12.2
लवळे : 7.5
शनिवारी पहाटे 5 ते
दुपारी 3 पर्यंत (मि.मी.)
शिवाजीनगर ः 7.8
लोहगाव : 17.8
चिंचवड : 12
मगरपट्टा : 14

राज्यात मान्सून अंशतः सक्रिय झाला असला, तरीही शहरातील हा मोठा पाऊस लोकल इफेक्टमुळे बरसला आहे. दोन ते तीन दिवसांपासून उष्मा खूप वाढल्याने वातावरणातील अस्थिरतेमुळे हा पाऊस झाला आहे. यंदाच्या मोसमातील हा मोठा पाऊस आहे. आगामी 48 तास शहर व परिसरात असाच पाऊस पडेल, असा अंदाज आहे. घाटमाथ्यावरील काही भागांत अतिवृष्टी होऊ शकते. तेथे दोन दिवस येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

-अनुपम कश्यपी, हवामान अंदाज विभागप्रमुख, पुणे वेधशाळा.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT