Latest

राष्ट्रीय तपास संस्थेकडून पुणे, ठाण्यात छापे; दहा संशयित दहशतवादी ताब्यात

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुण्यासह ठाणे आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात छापे टाकले. या कारवाईत राष्ट्रीय तपास संस्था आणि राज्य दहशतवादी विरोधी पथक (एटीएस)सहभागी झाले होते. ठाणे शहरातून पडघा आणि राज्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई करून दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पुण्यातील कोंढवा परीसरात देखील पथकांनी छापेमारी केली असून काहीजणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

एनआयएकडून याप्रकरणात सखोल तपास करण्यात येत आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार एनआयए आणि एटीएसच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील पडघा, पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात छापे टाकून दहा संशयितांना ताब्यात घेतले. दहाजणांची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली. दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँम्बस्फोट करण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन,

अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे ) यांना अटक करण्यात आली होती.जुलै महिन्यात पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आमल यांना अटक करण्यात आली होती. कोंढव्यात आरोपी साकी, खान, आमल वास्तव्यास होते. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांचे बंदी घातलेल्या अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात उघडकीस आले होते. राजस्थानात चितोड परिसरात त्यांच्याविरुद्ध स्फोटके बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते पसार झाले होते. तपासात तिघे दहशतवादी आयसिसच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते.

महाराष्ट्र, गोवा, तेलंगणात आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्याचे काम त्यांच्याकडे साेपविण्यात आले होते. दहशतवाद्याकडून पिस्तूल, स्फोटके सापडले होते. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कोंढव्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाँम्बस्फोट घडविल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी दुर्गम भागात लपण्याची जागा शोधली होती. पुण्यातील महत्वाच्या लष्करी संस्थांच्या परिसराचे त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT