Latest

गट, गण रचनेत भौगोलिक सलगता हद्दीचेे उल्लंघन; हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी

अमृता चौगुले

पुणे : जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गण रचनावरील प्रारूप आराखड्यावर गुरुवारी सुनावणी झाली. 150 सूचना आणि हरकती दाखल झाल्या. यातील 61 हरकती या फक्त जुन्नर तालुक्यातील होत्या, तर इंदापूर तालुक्यातील 26 हरकती आणि सूचना दाखल झाल्या. नवी रचना करताना भौगोलिक सलगता हद्दी आणि काही ठिकाणी लोकसंख्येचेदेखील उल्लंघन झाल्याची बाब हरकतीद्वारे निदर्शनास आणून देण्यात आली.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या गट रचनेच्या प्रारूप आराखड्यावर आलेल्या पुणे जिल्ह्यातील हरकती आणि सूचना यांच्यावर विभागीय आयुक्त सौरभ यांच्यापुढे सुनावणी झाली. जुन्नर तालुक्यामध्ये प्रारूप प्रश्न करताना काही ठराविक गावांचा समावेश विशिष्ट गटांमध्ये केल्याने हरकती दाखल होत्या. काही गावांचा समावेश करताना राज्य निवडणूक आयोगाचे परिपत्रक आणि नियम यांचे उल्लंघन झाल्याची बाबदेखील सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून देण्यात आली. याशिवाय खेड, हवेली, शिरूर, पुरंदर आणि भोर तालुक्यातून हरकतींवर सुनावणी झाली.

इंदापूर तालुक्यातील गट आणि गणांच्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. नवी रचना करताना भौगोलिक सलगता हद्दी आणि काही ठिकाणी लोकसंख्येचेदेखील उल्लंघन झाल्याची बाब हरकतीद्वारे निदर्शनास आणण्यात आली. विशेषत: भाजपकडून या हरकती घेण्यात आल्या होत्या, तर त्याला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेली गट आणि गणना योग्य आणि बरोबर असल्याचा युक्तिवाद केला गेला. हरकतधारकांनी मोठ्या प्रमाणात प्रारूप रचनेत नियमांचे उल्लंघन झाल्याची बाब निदर्शनास आणली.
विभागीय आयुक्त घेणार निर्णय गट, गण रचनेवर सर्वांच्या हरकती, सूचना ऐकून घेतल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव हे येत्या 22 जूनला त्यावर निर्णय घेणार आहेत, तर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख 27 जूनला जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गण रचना प्रसिद्ध करणार आहेत.

SCROLL FOR NEXT