Latest

पुणे: मोरगाव येथील महावितरण कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा कोयत्याने हल्ला करून खून

अविनाश सुतार

मोरगाव : पुढारी वृत्तसेवा:  मोरगाव (ता. बारामती) येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपकेंद्रात कार्यरत असणाऱ्या रिंकू राम थिटे (वय ३६) या महिला कर्मचाऱ्यावर अभिजित दत्तात्रय पोटे याने कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रिंकू यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २४) सकाळी ११ च्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकरणी हल्लेखोर अभिजित पोटे याला पोलिसांनी अटक केली आहे.

राज्य विद्युत वितरण विभागाचे मोरगाव येथील उपकेंद्र मोरगाव हे शासकीय विश्रामगृहाशेजारी मोरगाव-जेजुरी रस्त्यालगत आहे. या ठिकाणी वीजबिल जास्त आले आहे, अशी विचारणा करण्यासाठी अभिजित दत्तात्रय पोटे गेला होता. मीटर रीडिंग चुकीचे आहे, असे पोटेचे म्हणणे होते. त्याची दखल घेत नसल्यामुळे रागाने बेभान होऊन पोटेने रिंकू यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या आरडाओरड्याने जवळच असलेला ऑपरेटर पळत आल्याने मारेकरी पोटे याने पलायन केले. दरम्यान थिटे यांच्यावर मोरगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुणे येथे पाठविण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान थिटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोमेश्वर विभागाचे उपअभियंता संतोष चव्हाण यांनी दिली.

या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवून माथेफिरू हल्लेखोर अभिजित पोटे याला अटक केली. दरम्यान, बारामती विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन राठोड, सुपेचे सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जिनेश कोळी, नवनाथ पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT