Latest

माजी आमदार प्रा. शरद पाटील : राजकारणातील संत हरपला

अनुराधा कोरवी

प्राध्यापक शरद पाटील यांचे आज निधन झाले. प्रा. पाटील यांचा जन्म10 जानेवारी 1944 रोजी झाला. येत्या 10 जानेवारीला त्यांचा 80 वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या हालचाली कार्यकर्ते करीत होते. परंतु त्यांचे निधन झाले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आर. पी. अण्णा पाटील यांच्यापोटी त्यांचा जन्म झाला. त्यांच्यावर वडिलांचे चांगुलपणाचे आणि गोरगरिबांची कणव असणारे संस्कार झाले होते. त्यांचे शिक्षण कुपवाड, सांगली, कोल्हापूर, मुंबई आदी ठिकाणी झाले. इंग्रजी हा विषय घेऊन ते एम.ए. झाले आणि इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले. ते इंग्रजीचे अत्यंत चांगले प्राध्यापक होते. त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर आजही काम करीत आहेत. सांगली जिल्ह्यात बॅरिस्टर पी. जी. पाटील यांच्यानंतर इंग्रजीचे चांगले प्राध्यापक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता.

संबंधित बातम्या 

गोरगरिबांविषयी कणव असल्याने 1971 साली ख्रिस्तवासी जोसेफ फर्नांडिस यांनी सुरू केलेला वृद्धाश्रम त्यांनी चालविला. वृद्धांची सेवा केली. त्या वृद्धाश्रमाला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रपतींच्याहस्ते प्रा. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. वृद्धाश्रमाची एक शाखा त्यांनी कुष्ठरोगी वसाहतीत चालवली. निरोगी स्त्री-पुरुषांबरोबरच कुष्ठरोग्यांची सुद्धा त्यांनी सेवा केली. 1979 मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुपवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. 1990 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते. एक आदर्श जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.

सामान्य माणसांची व गरिबांची जाण असणारा आणि त्यांचे प्रश्न सोडविणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. त्या प्रतिमेच्या जोरावरच 1990 आणि 1995 मध्ये मिरज मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. एक अभ्यासू आमदार म्हणून विधानसभेत त्यांनी आपला ठसा उमटवला. 2002 मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले.

विधानसभेत दहा वर्षे व विधानपरिषदेत सहा वर्षे अशी सोळा वर्षे त्यांनी विधिमंडळाचे सदस्य म्हणून अत्यंत प्रभावी काम केले. गोरगरीब, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न ऐरणीवर आणले. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली यशवंत शिक्षण संस्था त्यांनी नुसती चालवलीच नाही, तर तिचा विस्तार केला. एक महाविद्यालय, सात माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, बालवाड्या असा पसारा त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळला. गोरगरीब, दलित, अल्पसंख्याक, खेड्यातील कष्टकर्‍यांची मुले, सामान्य शेतकर्‍यांची मुले शिकली पाहिजेत, ही त्यांची तळमळ होती.

साने गुरुजी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा त्यांनी चालवला. राष्ट्र सेवा दल वाढीसाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. सेवा दलाला मदत केली. सेवा करायला प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीला आशीर्वाद दिला. 2011 पासून शेतकर्‍यांना पेन्शन मिळावी यासाठी लढा उभा केला. कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्रा काढली. अशातर्‍हेने कायम सार्वजनिक जीवनात सामान्यांचे प्रश्न शेतकरी, शेतमजूर, कामगार दलित, अल्पसंख्याक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक् प्रयत्न केले.

50 वर्षांच्या सार्वजनिक व राजकीय जीवनात त्यांनी आपली प्रतिमा स्फटिकासारखी स्वच्छ ठेवली. दमडीचाही अपहार केला नाही. त्यामुळे त्यांना राजकारणातला संत म्हणून ओळखतात. सार्वजनिक जीवनात एक चारित्र्यसंपन्न नेता, स्वच्छ प्रतिनिधी असा त्यांचा लौकिक आहे. गढूळ पाण्यामध्ये तुरटीचा खडा जसा काम करतो, तसा राजकारणातील हा तुरटीचा खडा कार्यकर्त्यांचा आधार होता. मी स्वतः गेली 50 वर्षे त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. त्यांनी एकूण दहा निवडणुका लढविल्या. त्यातील चार जिंकल्या. त्यांची उमेद कधीही कमी झाली नाही.

अशा या राजकारणातील संताला विनम्र अभिवादन! त्यांच्या मृत्यूने जिल्ह्यातील स्वच्छ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा आधार हरपला आहे. शेतकरी, शेतमजूर यांचा कैवारी आज आपल्यात नाही. त्यांचे कार्य यापुढेही चालू ठेवणे हे परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचे काम आहे. कारण त्यांनी परिवर्तनवादी चळवळीला फार मोठी साथ दिली. त्या चळवळीबद्दल त्यांना प्रचंड सहानुभूती होती. त्यामुळे ती चळवळ पुढे चालविणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT