Latest

भगर क्विंटलमागे दोन हजार, तर साबुदाणा 700 रुपयांनी महाग

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी पावसामुळे कच्च्या मालाचे नुकसान होऊन उत्पादनात घट झाल्याने उपवासाच्या पदार्थांसाठी लागणार्‍या भगर व साबुदाण्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत साबुदाणा क्विंटलमागे 600 ते 700 रुपयांनी आणि भगर प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांनी महागली आहे.

देशातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू या भागातून भगरीसाठी लागणारा कच्चा माल नाशिक येथील मिलमध्ये पाठविण्यात येतो. तेथून प्रक्रिया झालेली भगर मार्केट यार्डातील भुसार बाजारात दाखल होते. तर तमिळनाडूमधील सेलम जिल्ह्यातून बाजारात आवक होते. मार्केट यार्डातील भुसार बाजारात भगर व साबुदाण्याचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. बाजारात नाशिक येथून 25 ते 30 टन रोज भगर, तर सेलम येथून 160 टन साबुदाणा बाजारात दाखल होत आहे. मार्गशीर्ष महिना सुरू असल्याने खिचडी, दशमी, पुरी, भाजणी, थालीपीठ आदींसह विविध पदार्थ तयार करण्यासाठी त्याला मागणीही चांगली आहे. परिणामी, भगर व साबुदाण्याच्या भावात तेजी आली आहे.

भगरीमध्ये असणारे गुणधर्म

भगरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ती पचायला हलकी असून तिच्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामध्ये कॅलरी व कॉर्बोहायड्रेडचे प्रमाण कमी असते. भगरीत व्हिटॅमिन 'सी', 'ए' आणि 'इ' जास्त प्रमाणात असतात. साध्या भातापेक्षा भगरीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.

''सध्या नवीन हंगामातील साबुदाणा व भगर बाजारात दाखल होत आहे. मार्गशीर्ष सुरू असल्याने त्याला मागणीही चांगली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी व मागणी जास्त असल्याने भगर, साबुदाण्याचे भाव तेजीत आहेत.''
                                                                                                                – आशिष दुगड, साबुदाणा व भगरीचे व्यापारी

SCROLL FOR NEXT