Latest

पुण्यात पंतप्रधानांचे स्वागत अन् बंदोबस्ताची कसोटी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुठे रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याची लगबग, कुठे पोलिसांच्या बंदोबस्ताची आखणी, कुठे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोरच्या रस्त्यावर विलोभनीय कमानी, तर कुठे नाश्ता-भोजनाचा मेनू ठरवण्याची चर्चा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारी होणार्‍या पुणे दौर्‍यासाठी शासकीय-राजकीय पातळीवर लगीनघाई सुरू असल्याचे दिसून आले. शहराच्या मध्यवर्ती भागातच कार्यक्रम होत असल्याने ठरावीक रस्ते वगळता इतरत्र वाहतूक सुरळीत ठेवण्याची कसोटीच पोलिस प्रशासनापुढे असल्याने त्यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू होते.

शहरातील सर्वांत दाट वस्ती असलेला परिसर, अरुंद रस्ते, त्यातच गेल्या काही दिवसांत दहशतवादी कारवाईच्या समोर आलेल्या बाबी आणि विरोधकांनी दिलेला आंदोलनाचा इशारा, या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारचा दौरा पोलिसांच्या दृष्टीने आजवरचा सर्वाधिक संवेदनशील बंदोबस्त असणार आहे. हा बंदोबस्त पार पाडताना पोलिसांचा कस लागणार आहे. दरम्यान, मोदींचे कार्यक्रम असलेल्या परिसरातील शाळा, महाविद्यालये, दुकाने, हॉटेल, आस्थापना बंद ठेवण्यात येणार असल्याची सोमवारी
दिवसभर चर्चा सुरू होती.

मात्र, पोलिसांनी पत्रकाद्वारे कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालये, तसेच आस्थापना बंद ठेवण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर दौर्‍याच्या मार्गावरील कोणताही रस्ता मोठ्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार नसून, पंतप्रधानांचा ताफा मार्गस्थ होताच तेथील वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी येणार्‍या निमंत्रित नागरिक व व्हीआयपी यांच्या वाहनांना कोठेही अडथळा होणार नाही, याची दक्षता वाहतूक विभागाकडून घेण्यात आली आहे. सोमवारी राज्याचे पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलिस महासंचालक, एसपीजीचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी पोलिस आयुक्तांसोबत पंतप्रधानांच्या दौर्‍याचा आढावा घेतला.

या वेळी त्यांनी विमानतळ ते सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाचे मैदान पंतप्रधानांचे कार्यक्रमस्थळ याची पाहणी केली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा आदींनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. विशेष सुरक्षा पथकाने पंतप्रधानाच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. हेलिकॉप्टर उतरण्याचे ठिकाण (हेलिपॅड), कार्यक्रम स्थळ, तसेच पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. याशिवाय, पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीच्या पथकांकडे असणार आहे.

शहरातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता हा सर्वांत गजबजलेला भाग आहे. येथील रस्तेही चिंचोळे आहेत. तसेच या रस्त्यांना पर्यायी रस्ते नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांचा ताफा या रस्त्यावरून जात असताना सर्वाधिक काळजी घ्यावी लागणार आहे. शहरात ड्रोन कॅमेरे वापरास मनाई करण्यात आली असून, परवानगीशिवाय ड्रोन कॅमेर्‍याचा वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिला आहे.

एक कॉनव्हॉय अडकला

सोमवारी सकाळी पोलिसांनी पंतप्रधानांच्या दौर्‍याची रंगीत तालीम घेतली. एकाच वेळी दोन कॉनव्हॉय रस्त्यावर धावले. त्या वेळी मध्यवस्तीत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. एक कॉनव्हॉय वाहतूक कोंडीत अडकून पडला होता. टप्प्याटप्प्याने शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. प्रमुख रस्ते, उपरस्ते, चौकात सरकते लोखंडी कठडे (बॅरिकेडिंग) उभे करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अचानक वाहतूक बंद केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय झाली. त्यामुळे आजच्या दौर्‍याच्यावेळी पोलिसांना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी होऊ न देता रस्ते रिकामे ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त

या बंदोबस्तासाठी बाहेरच्या जिल्ह्यातील दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. तर, पुणे शहरातील तीन हजार पोलिसांची कुमक असणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले एसपीजीची पथके, फोर्सवन, एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिस महासंचालक रजनीश शेठ सोमवारी सकाळी शहरात दाखल झाले होते. त्यांनी संपूर्ण बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यांच्याबरोबर राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था, तसेच वेगवेगळ्या विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश होता. याशिवाय, राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, असे वेगवेगळ्या विभागाचे 3 हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा वेगळा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाहतूक बदल केलेले रस्ते

आचार्य आनंदऋषीजी चौक (पुणे विद्यापीठ चौक), वेधशाळा चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, शिवाजी रस्ता, बुधवार चौक, सेवासदन चौक, टिळक चौक (अलका चित्रपटगृह), टिळक रस्ता, जेधे चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, संगमवाडी रस्ता, येरवडा सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रस्ता.

शिवाजी रस्त्यावर लगीनघाई

शिवाजी रस्ता कायमच गर्दीने गजबजलेला असतो. मात्र, सोमवारी पोलिस कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात शुकशुकाट दिसत होता. पंतप्रधान मंगळवारी सकाळी प्रथम दगडूशेठ गणपतीच्या दर्शनास येत आहे. त्यामुळे शनिवारवाडा ते दगडूशेठ गणपती या रस्त्यावर पूर्व तयारीची लगबग सुरू होती. झेंडे, कमानी व बॅनरने रस्ता सजवलेला आहे. महापालिकज्ञा कर्मचार्‍यांची येथे जणू लगीनघाई सुरू हाीेती.

'दगडूशेठ'ला नाश्ता दगडूशेठ हलवाई गणपती

मंदिराजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान सकाळी दिल्लीहून निघाल्यानंतर ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरतीसाठी येणार आहेत. त्याठिकाणी त्यांना आवश्यकता भासल्यास त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून ट्रस्टला करण्यात आली आहे. त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT