Latest

पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यात आज विविध प्रकल्पांचे उद्घाटन

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी (दि.1) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी पुणे दैर्‍यावर येणार आहेत. या वेळी त्यांच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गिका सेवांचे उद्घाटन, गृहप्रकल्पांचे लोकार्पण, नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यांसह विविध प्रकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी सव्वा दहा वाजता पुण्यात दाखल होणार असून, सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आरती करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह एकाच व्यासपीठावर असणार आहेत. त्यानंतर, दुपारी 12.45 वाजता पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीने विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

त्यानंतर ते मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करतील. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचर्‍यापासून ऊर्जा निर्माण करणार्‍या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार असून, ते या पुरस्काराचे 41 वे मानकरी आहेत. या पुरस्काराने यापूर्वी डॉ. शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. ई. श्रीधरन आदींना सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT