Latest

President’s Medal : सीबीआयच्या जॉइंट डायरेक्टर विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा; केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) जॉइंट डायरेक्टर विद्या जयंत कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्या साऊथ झोन विभागात सीबीआयच्या जॉइंट डायरेक्टर पदावर कार्यरत आहे. धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या त्या बहिण आहेत. (President's Medal)

सोलापूर जिल्ह्यातील तिर्हे या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी असलेल्या विद्या कुलकर्णी यांनी शिक्षणात कठोर परिश्रम घेतले. तिर्हे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर सांगली वालचंद या प्रतिष्ठित महाविद्यालयातून त्यांनी बी. ई. कम्प्युटरचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी आयपीएसच्या शिक्षणासाठी कठोर परिश्रम घेतले. यात 1998 च्या बॅच मधून तामिळनाडू केडर मधून त्या आयपीएस झाल्या आहेत. सध्या त्या सीबीआय च्या जॅाइंट डायरेक्टर (साऊथ झोन) पदावर कार्यरत आहेत. धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सौ. वर्षा घुगरी यांच्या त्या लहान भगिनी आहेत. (President's Medal)

राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, अशा प्रकारे सन्मानाचे पदक जाहीर झाल्याने प्रशासन सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे विभागात काम करण्याची जबाबदारी देखील आणखी वाढते. हा पुरस्कार मिळाल्याचे आनंद आणि समाधान असून या पुढील काळात आणखी जोमाने देशसेवा आणि विभागाची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय प्रशासन सेवेत येण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी संदेश दिला आहे. पोलीस सेवेत येण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाने 24 तास काम करण्याची तयारी ठेवून या देशसेवेच्या कामात अवश्य सहभागी झाले पाहिजे. असे देखील त्यांनी सांगितले. राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे विद्या कुलकर्णी यांचे त्यांचे आप्तेष्ट आणि विभागातील अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT